Kamal Haasan Rati Agnihotri Dekha Pyar Tumhara: बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते कमल हासन आणि रती अग्निहोत्री यांनी १९८५ मध्ये ‘देखा प्यार तुम्हारा’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान दोन्ही कलाकारांमध्ये प्रचंड तणाव होता आणि त्यांनी एकमेकांना ‘हाय-हॅलो’सुद्धा केले नव्हते. निर्माते रणबीर पुष्प यांनी यामागचे कारण सांगितले आहे. कमल हासन यांना पूनम ढिल्लों यांच्याबरोबर काम करायचे होते, परंतु निर्मात्यांनी रती अग्निहोत्रींना साईन केल्यामुळे सेटवर अबोला पसरला होता. तसेच, कमल हासन यांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि सारिकासोबतच्या अफेअरवरही निर्मात्यांनी मोठे भाष्य केले आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत रणबीर पुष्प यांनी ‘देखा प्यार तुम्हारा’ या चित्रपटाची आठवण सांगितली. या चित्रपटासाठी मुख्य कलाकारांचं कास्टिंग सुरू होतं. कमल हासन यांची निवड आधीच झाली होती. कोणत्या अभिनेत्रीला घ्यायचं, याबाबत निर्माते विचार करत होते. कमल हासन यांची इच्छा होती की पूनम ढिल्लों यांना घेण्यात यावं, पण रणबीर पुष्प यांनी रती अग्निहोत्री यांना कास्ट करायचं ठरवलं. पुष्प यांनी रती अग्निहोत्रीच्या वडिलांशी संपर्क साधला आणि रती यांना चित्रपटासाठी साईन केलं. रती यांचे वडीलच त्यांचे मॅनेजर म्हणून काम पाहायचे.
कमल हासन व रती एकमेकांशी बोलायचेच नाहीत
रणबीर पुष्प पुढे म्हणाले, “रती अग्निहोत्री यांना साईन केल्याचं समजल्यावर ‘दुसऱ्या कुणाला का घेतलं नाही?’ असा प्रश्न कमल हासन यांनी विचारला नाही. ते भडकलेही नाही. ते समजूतदार होते. मात्र, त्यांना ही बाब आवडली नसल्याने सेटवर तणाव दिसून आला. पुष्प म्हणाले, “काही दिवसांनी आम्हाला समजलं की कमल आणि रती एकमेकांशी बोलतच नाहीत. मग आता हा चित्रपट पूर्ण कसा होणार? असा प्रश्न आमच्यासमोर उभा ठाकला.”
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांच्यात अबोला कायम राहिला. “शूटिंग सुरू असताना त्यांनी एकदाही एकमेकांना ‘हाय’ किंवा ‘हॅलो’सुद्धा केलं नाही, तरीही त्यांनी एकत्र चित्रपट पूर्ण केला. तुम्ही तो चित्रपट पाहिला तर दोघे एकमेकांशी अजिबात बोलायचे नाहीत, असं अजिबात वाटणारही नाही. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण होईस्तोवर ते एकदाही एकमेकांशी बोलले नाहीत,” असं रणबीर पुष्प यांनी सांगितलं.
कमल हासन यांचे वैयक्तिक आयुष्य
रणबीर पुष्प यांनी कमल हासन यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही भाष्य केलं. तेव्हा कमल हासन यांचं लग्न वाणी गणपतीशी झालं होतं. हे लग्न १० वर्षे टिकले आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला. पुष्प यांच्या मते, वाणी गणपतीशी विवाहित असतानाच कमल हासन आणि सारिका यांचं अफेअर सुरू झालं. “कमल हासन विवाहित असल्याने त्यांच्या अफेअरबद्दल खूपच कमी लोकांना माहीत होतं,” असं रणबीर पुष्प म्हणाले.
१९८४ साली कमल हासन यांनी सारिकाबरोबर पहिला चित्रपट केला होता. सेटवर जाणवायचं की त्यांच्यात काहीतरी सुरू आहे. कारण दोघेही एका कोपऱ्यात एकत्र बसलेले असायचे, असं रणबीर पुष्प यांनी सांगितलं. पुढे, कमल हासन व सारिका यांचं लग्न झालं. त्यांना श्रुती हासन व अक्षरा हासन या दोन मुली झाल्या आणि काही काळाने कमल हासन व सारिका यांचा घटस्फोट झाला.
