Shruti Haasan Hair Care Tips: वाढते प्रदूषण, कमी प्रमाणात घेतलेली झोप, पाण्याचे कमी प्रमाण, संतुलित आहाराचा अभाव या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर होत असतो. तसेच त्वचा व केसांच्या समस्यादेखील निर्माण होतात.

त्वचा व केस निरोगी ठेवण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जातात. योग्य मार्गदर्शनासाठी आणि समस्या लवकर कमी व्हाव्यात, यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे आणि त्यांनी सांगितल्यानुसार उपाय योजना करणे महत्त्वाचे ठरते.

आता कमल हासन यांची मुलगी व अभिनेत्री श्रुती हासनने एका मुलाखतीत ती त्वचेची कशी काळजी घेते, याबद्दल खुलासा केला आहे. अभिनेत्रीने नुकतीच Tweak India ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला तिच्या वडिलांनी कोणता सल्ला दिला होता, याबद्दलही वक्तव्य केले. ती नेमकं काय म्हणाली, हे जाणून घेऊ…

“मी तिळाचे तेल आणि नारळाचे तेल…”

श्रुती हासन म्हणाली, “मी तेल खाण्यावर विश्वास ठेवते. केसांना तेल लावणे, शरीरावर तेल लावणे यावर मी विश्वास ठेवते.” पुढे ती कोणते तेल वापरते? यावर अभिनेत्री म्हणाली, “ही काही रेसिपी नाही. पण मी तिळाचे तेल आणि नारळाचे तेल एकत्र करून लावते. मला माझ्या वडिलांनी सांगितले आहे की तिळाच्या तेलाचा आपल्या शरीराला आणि केसांना फायदा होतो.”

सी के बिर्ला हॉस्पिटल येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर रुबेन पस्सी यांनी दी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. तिळाच्या तेलाचा केस व त्वचेसाठी कसा उपयोग होतो, हे सांगितले. ते म्हणाले, “फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटॅमिन ई, बी-कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स आणि मॅग्नेशियम व कॅल्शियमसारख्या खनिजे असलेले तिळाच्या तेलामुळे टाळूला खोलवर आर्द्रता मिळते.

“तेलामुळे केसांची मुळे मजबूत होतात. केसांची वाढ होते. यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म कोंडा कमी करण्यास आणि टाळूवरील सूज तसेच जळजळ कमी करण्यास मदत करतात. तिळाच्या तेलाचे तेल यूव्ही किरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून केसांचे संरक्षण करते. याबरोबरच या तेलात अँटिऑक्सिडंट्स असतात. ते केस अकाली पांढरे होण्यापासून रोखतात. कोमट तेलाने डोक्याला मालिश केल्याने रक्तप्रवाह वाढतो. यामुळे केसांचे आरोग्य सुधारते”, असे सांगत डॉक्टर रुबेन पस्सी यांनी तिळाच्या तेलाचे केसांसाठी काय फायदे आहेत, हे त्यांनी सांगितले.

श्रुतीबद्दल बोलायचे तर ती स्वत: नावाजलेली अभिनेत्री आहे. २००९ मध्ये श्रुतीने ‘लक’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. २०११ मध्ये तिने तेलुगु आणि तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. अभिनयाशिवाय श्रुती पार्श्वगायिकादेखील आहे. तिचा स्वत:चा म्युझिक बँडदेखील आहे. ती नुकतीच प्रशांत नील यांच्या ‘सालार पार्ट १: सीजफायर’ मध्ये दिसली होती.