१९९० च्या दशकाच्या सुरुवातीला बॉलीवूडमध्ये अनेक तरुण कलाकारांनी पदार्पण केले. त्यापैकी आमिर, सलमान आणि शाहरुख या तीन खानांनी चित्रपटसृष्टीवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. पण, काही काळासाठी त्यांना राहुल रॉय, अजय देवगण, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांसारख्या कलाकारांकडून मोठी टक्कर मिळाली. यांपैकीच एक असा स्टार होता, ज्याने यशाच्या शिखरावर पोहोचण्यापूर्वी एका अत्यंत भयंकर घटनेचा सामना केला होता. या अभिनेत्याचं नाव कमल सदाना.
कमल सदानाने १९९२ मध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. याच वर्षी शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्याही करिअरलाची सुरुवात झाली. कमल सदानाचा पहिला चित्रपट ‘बेखुदी’ होता. त्याच सिनेमातून १७ वर्षांच्या काजोलनेही पदार्पण केलं होतं. हा चित्रपट फ्लॉप झाला. नंतर कमलने १९९३ मध्ये आलेल्या ‘रंग’ चित्रपटात काम केलं, हा चित्रपट हिट झाला. यामध्ये त्याने दिव्या भारतीबरोबर काम केलं होतं. कमलचा चॉकलेट हिरोचा लुक प्रेक्षकांना फार आवडला. अवघ्या २१ वर्षांचा कमल हा तिन्ही खानचा प्रतिस्पर्धी मानला जाऊ लागला. कमल सदानाला सहज यश मिळालं, असं वाटू शकतं, पण त्याचा प्रवास तेवढा सोपा नव्हता.
कमलच्या २० व्या वाढदिवशीच वडिलांनी कुटुंबाला संपवलं
१९९० मध्ये कमलचा २० व्या वाढदिवशीच त्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कमल वाढदिवसाच्या पार्टीच्या तयारीत व्यग्र होता. तेव्हा त्याचे वडील आणि निर्माते ब्रिज सदाना यांनी स्वतःची पत्नी आणि मुलीवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. त्यांनी कमलवरही गोळी झाडली आणि नंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. कमलच्या मानेला गोळी लागली होती, पण तो बचावला.
तो प्रसंग अत्यंत भयंकर होता – कमल सदाना
२०२३ मध्ये सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत कमलने त्या प्रसंगाची आठवण सांगितली होती. “तो प्रसंग अत्यंत भयंकर होता. स्वतःच्या डोळ्यांसमोर संपूर्ण कुटुंबाची हत्या होताना पाहणं सोपं नाही. माझ्यावरही गोळी झाडली होती, ती मानेच्या एका बाजूने घुसून दुसऱ्या बाजूने बाहेर पडली. यातून मी जिवंत वाचलो यामागे काहीच तार्किक कारण नाही. कारण गोळी आरपार होऊनही मी बचावलो,” असं कमल सदाना म्हणाला होता.

कमल सदानाचे करिअर
‘रंग’ चित्रपटानंतर कमलने अनेक चित्रपट साइन केले, पण ते सगळे फ्लॉप झाले. २००५ मध्ये त्याने स्वतःचे करिअर पुन्हा रुळावर आणण्यासाठी ‘कर्कश’ चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पण हा चित्रपटही फ्लॉप झाला. त्यानंतरच्या वर्षी त्याने आपल्या वडिलांच्या ‘व्हिक्टोरिया नंबर २०३’ या चित्रपटाचा रिमेक केला, पण तोही फ्लॉप झाला. यानंतर कमल सदाना बॉलीवूडपासून दुरावला.
इंडस्ट्रीपासून दुरावल्यावर कमल सदानाने काय केलं?
२०२१ मध्ये ‘हिंदुस्तान टाईम्स’शी बोलताना त्याने यामागचं कारण सांगितलं. “त्या काळात मी पुन्हा निर्मिती क्षेत्राकडे वळलो. मी स्वतंत्र चित्रपटांचे दिग्दर्शन आणि एडिटिंग केले. मी व्हिज्युअल इफेक्ट्सचा कोर्स केला, त्याचा वापर मी ‘रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स’ (२०१४) या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान केला. तो अनुभव खूप चांगला होता. त्यानंतर मी ॲनिमेशनचाही कोर्स केला आणि प्री-व्हिज्युअलायझेशनमध्ये काम करणारा एक छोटा स्टुडिओ सुरू केला,” असं कमल सदाना म्हणाला.
जवळपास दोन दशकं अभिनयापासून दूर राहिल्यानंतर, २०२२ मध्ये रेवती दिग्दर्शित ‘सलाम व्हेंकी’ या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारून कमल सदाना मोठ्या पडद्यावर परतला. यात त्याने त्याची पहिली सह-कलाकार काजोलबरोबर काम केलं. त्यानंतर २०२३ मध्ये त्याने ‘पिप्पा’ चित्रपटात फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची एक छोटी भूमिका केली.
