अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेल्या ‘दृष्यम’ फ्रँचायझीमध्ये अनेक लोकप्रिय कलाकार आहेत. चित्रपटातील संवाद, पात्र प्रचंड लोकप्रिय आहेत. त्यापैकीच एक म्हणजे यामध्ये लक्ष्मीकांत गायतोंडे हे पात्र. जे मराठमोळे अभिनेते कमलेश सावंत यांनी साकारलं आहे. अशातच त्यांनी शूटिंगदरम्यानच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. यावेळी त्यांनी एका सीनसाठी रिहर्सल करत असताना चुकून चित्रपटात अजय देवगणच्या मुलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री इशिता दत्ताला कानाखाली मारल्याचा प्रसंग सांगितला आहे. त्यावेळी नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊ.

‘दृष्यम’च्या सेटवर काय घडलं होतं?

‘दृश्यम २’च्या रिहर्सलदरम्यान घडलेला एक प्रसंग कमलेश सावंत यांनी सांगितला. चित्रपटातील एका दृश्यात त्यांना इशिता दत्ताच्या कानाखाली मारायची होती. या सीनसाठी दोघांनी ठरावीक अंतर ठेवून सराव केला होता. मात्र, प्रत्यक्ष शूटिंगदरम्यान त्यांच्यातील अंतर कमी झालं आणि कमलेश यांच्या हाताचा इशिताच्या चेहऱ्याला चुकून फटका बसला. या घटनेमुळे कमलेश घाबरले होते. त्यातच दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी संताप व्यक्त केल्याने त्यांची चिंता आणखी वाढली. मात्र, इशिताने लगेच हस्तक्षेप करत, दोघांमधील अंतर बदलल्यामुळे हा अपघात घडल्याचं स्पष्ट केलं.

‘स्क्रीन’शी संवाद साधताना कमलेश सावंत म्हणाले, “रिहर्सलदरम्यान एका दृश्यात मला इशिता दत्ताच्या कानशिलात मारायची होती. त्यावेळी आमच्यात ठरावीक अंतर होतं. मात्र, प्रत्यक्ष शूटिंगच्या वेळी हे अंतर कमी झालं. रिहर्सलमध्ये ठरल्याप्रमाणे मी हात उचलला आणि माझा हात थेट इशिताच्या चेहऱ्याला लागला. दुसऱ्या बाजूला असलेल्या निशिकांत कामत सरांनी मला शिवीगाळ केली. तेव्हा इशिताने लगेच हस्तक्षेप केला आणि ती म्हणाली, नाही, नाही सर! यात त्यांची काहीच चूक नाही. माझ्यामुळे आमच्यातील अंतर कमी झालं आणि त्यांनी रिहर्सलमध्ये ठरल्याप्रमाणे हात उचलला. त्यामुळे ही माझी चूक आहे.”

कमलेश सावंत व इशिता दत्ता यांचा एकत्रित सीन

इशिताने त्यावेळी दिलेल्या प्रतिक्रियेचा आपल्यासाठी खूप मोठा अर्थ असल्याचं कमलेश यांनी सांगितलं. घडलेल्या प्रकारामुळे ते आधीच खूप घाबरले होते. ते म्हणाले, “इशिता माझ्या समर्थनार्थ पुढे आली, ही खूप मोठी गोष्ट होती. घाबरल्यामुळे माझा चेहरा लाल झाला होता.”

दरम्यान, अलीकडेच २ ऑक्टोबर रोजी ‘दृष्यम ३’ हा चित्रपट रिलीज झाला आणि थिएटरमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने कोट्यवधींचा गल्ला जमावला. ‘दृष्यम’ फ्रँचायझीमधील हा शेवटचा चित्रपट होता.