Kamlesh Sawant on Acting Career & Marriage at 37: ‘दृश्यम’ चित्रपटातील पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेने घराघरांत ओळख मिळवणारे मराठमोळे अभिनेते कमलेश सावंत यांनी स्क्रीनला दिलेल्या मुलाखतीत आपल्या अभिनय प्रवासाबद्दल सांगितलं. त्यांचा अभिनय प्रवास सोपा नव्हता. “तू हिरोसारखा दिसत नाहीस, त्यामुळे तुझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशाच भूमिका कर,” असा मोलाचा सल्ला त्यांच्या गुरूंनी दिला होता. दुसरीकडे, अभिनयात भविष्य न दिसल्याने “नाटक सोड अन् पगारी नोकरी शोध,” असा सल्ला त्यांची आई द्यायची. तसेच वयाच्या ३७ व्या वर्षी स्वतःपेक्षा ९ वर्षांनी लहान मुलीशी झालेल्या विवाहावरही त्यांनी भाष्य केलं.
कमलेश यांना अभिनय आणि नाटकांची प्रचंड आवड होती, पण त्यांच्या आईला त्यांच्या भविष्याची काळजी वाटत होती. आईचा नाटक किंवा अभिनय क्षेत्राशी कधीच संबंध न आल्याने त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्थिर करिअर करावं अशी त्यांची इच्छा होती. “तिचा मला एकच सल्ला होता-नाटक सोड आणि एखादी पगारी नोकरी शोध. ती मला सांगायची की, पैसे तू तुझ्याकडेच ठेव, पण आयुष्यात स्थिरता आण आणि स्वतःचं भविष्य घडव. तिला अभिनयात माझं भविष्य दिसत नव्हतं, कारण तिला या क्षेत्राबद्दल काहीच माहिती नव्हते. नाटक किंवा कोणताही शो पाहण्यासाठी तिच्याकडे पैसे नसायचे,” असं कमलेश सावंत यांनी सांगितलं.
मी हिरोसारखा दिसत नाही – कमलेश सावंत
आपण कोणत्या प्रकारच्या भूमिका करू शकतो, हे समजण्यास मदत करणाऱ्या गुरूंच्या सल्ल्याची आठवण कमलेश सावंत यांनी सांगितलं. “माझे गुरुजी नेहमी मला सांगायचे की, तू स्वतःचा आरसा सोबत घेऊन चालायला हवं. तुझ्या व्यक्तिमत्त्वाला शोभतील अशाच भूमिका कर आणि त्यासाठीच संघर्ष कर. ‘१०० लोकांपैकी जो एक माणूस आकर्षक दिसतो तो हिरो असतो. तू त्यांच्यापैकी नाहीस, तू हिरोसारखा दिसत नाहीस.’ मला माहीत आहे की नाटकांमध्ये काम केलं असेल, तरी हिरो म्हणून माझी गणना होऊ शकत नाही. त्यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वानुसार मी पोलिसाची भूमिका उत्तम करू शकतो,” असं कमलेश सावंत म्हणाले.
कमलेश सावंत यांनी ३७ व्या वर्षी लग्न केलं
कमलेश सावंत यांनी ३७ व्या वर्षी लग्न केलं होतं. “मी ३७ वर्षांचा असताना माझ्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान मुलीशी माझं लग्न झालं. तिने एअर होस्टेस होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण करावं अशी माझी इच्छा होती, आणि त्यानंतर दोन वर्षांनी आम्ही लग्न केलं. आम्ही कालाचौकी सोडून चांगलं आयुष्य जगावं अशी तिची इच्छा होती. आम्ही कळव्याला गेलो आणि तिथे भाड्याच्या घरात राहू लागलो. त्यावेळी वयाच्या ३७ व्या वर्षी मी पहिल्यांदा ३,४५० रुपयांची स्वतःसाठी वस्तू खरेदी केली होती. मी स्वतःला खूप नशीबवान मानतो,” असं कमलेश सावंत यांनी सांगितलं.
कमलेश सावंत यांच्या पत्नीचं नाव सपना सावंत फायनान्शियल अॅडवायझर आहे. त्यांना स्वरा नावाची एक मुलगी आहे.
