गेल्या काही दिवसांपासून पंजाबमध्ये अमृतपाल सिंग हे नाव चर्चेत आलं आहे. ‘वारिस पंजाब दे’ या खलिस्तान समर्थक संघटनेचा म्होरक्या असणारा अमृतपाल सिंग सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे. यामुळे पंजाबमध्ये गदारोळ पाहायला मिळत आहे. अशातच कंगना राणौतने गायक व अभिनेता दिलजीत दोसांझवर निशाणा साधला आहे.
कंगनाने सोशल मीडियावरील एक व्हायरल मीम शेअर करत दिलजीतला टोला लगावला आहे. कंगनाने ट्विटर आणि इंस्टाग्राम स्टोरीजवर एक पोस्ट शेअर केली आहे, ती सर्वात आधी स्विगी इंडियाने पोस्ट केली होती. यामध्ये अनेक प्रकारच्या डाळी दाखवल्या होत्या ज्यावर ‘पल्स आय पल्स’ असे लिहिले होते. आपल्या ट्वीटमध्ये दिलजीतला टॅग करत तिने ‘फक्त म्हणतेय’ असं लिहिलं होतं. तसेच इंस्टाग्राम स्टोरीजवर क्रॉस्ड आउट शब्द असलेलं एक स्टिकर टाकलं होतं. त्यात “दिलजीत दोसांझ जी पोल्स आ गई पोल्स,” असं लिहिलं होतं.
“खलिस्तानींना पाठिंबा देणाऱ्या सर्वांनी लक्षात ठेवा, पुढचा नंबर तुमचा आहे, पोल्स आले आहेत आणि ही ती वेळ नाही जेव्हा कोणी काहीही करायचं, देशाशी गद्दारी केली किंवा तो तोडण्याचा प्रयत्न केल्यास महागात पडेल. पुढला नंबर तुमचाच आहे, पोलीस पण इथेच आहे. आता कुणालाही वाट्टेल ते करता येणार नाही. जर तुम्हाला देशाची फसवणूक करायची असेल किंवा त्याचे तुकडे करायचे असतील तर तुम्हाला खूप वेळ लागेल,” असं कंगनाने दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी पंजाब पोलिसांनी शनिवारी अमृतपाल सिंग आणि त्याच्या साथीदारांविरोधात मोहीम सुरू केली होती. या प्रकरणात आतापर्यंत एकूण ११४ जणांना अटक करण्यात आली आहे आणि अमृतपालचा शोध घेतला जात आहे.