Bharat Bhhagya Viddhaata Movie : कंगना रणौत यांच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाची काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अशातच आता या चित्रपटाचं मोशन पोस्ट रिलीज झालं आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात काही लोकप्रिय मराठी कलाकार झळकणार आहेत.
कंगना रणौत अलीकडेच त्यांच्या ‘क्वीन २’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्पॉट झाल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि हातातील हिरवा चुडा यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं. पण तो त्यांचा चित्रपटातील लूक असल्याचं त्यांनी सोशल मीडियामार्फत स्पष्ट केलं होतं. अशातच आता त्यांच्या आगामी चित्रपटाचा पोस्टर समोर आला असून हा सिनेमा १२ जूनला रिलीज होणार आहे.
कंगना यांच्या मनीकर्णीका फिल्मस् प्रोडक्शन हाऊसच्या सोशल मीडिया पेजवरुन या चित्रपटाचं मोशन पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. यापूर्वी ६ मे रोजी चित्रपटाचं पोस्ट शेअर करण्यात आलेलं. समोर आलेल्या या मोशन पोस्टरला ‘कुछ खास करके आम ही कहलाते हैं, वो दिखते तो हैं, पर नज़र नहीं आते’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे.या पोस्टरमध्ये कंगना यांचा चित्रपटातील लूक पाहायला मिळत आहे. २००८साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हलल्यावर हा चित्रपट आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.
कंगना यांच्या चित्रपटात झळकणार ‘या’ मराठी अभिनेत्री
कंगना यांच्या या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय अभिनेत्री झळकणार आहेत.यामध्ये प्रिया बेर्डे ते गिरिजा ओक या अभिनेत्रींचा समावेश आहे. मनोज तपाडिया दिग्दर्शित या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत असून त्यांनीच या चित्रपटाची निर्मितीसुद्धा केली आहे. तर या चित्रपटात त्यांच्यासह प्रिया बेर्डे आणि गिरिजी ओक यांच्या व्यतिरिक्त स्मिता तांबे, इशा डे, सुहिता थत्ते, आशा शेलार अशा लोकप्रिय मराठी अभिनेत्री झळकणार आहे. त्यामुळे या चित्रपटाबद्दलची उत्सुक्ता अजून वाढली आहे.
दरम्यान, कंगणा शेवटच्या इमर्जन्सी आणि कनप्पा या चित्रपटांत झळकल्या होत्या. त्यांनी आतापर्यंत विविध विषय असलेल्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे. अभिनयासह दिग्दर्शन आणि निर्मितीसुद्धा त्या करत असतात.
