लोकप्रिय अभिनेत्री व राजकारणी कंगना रणौत अनेकदा त्यांच्या व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अनेकदा त्या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे वादाच्या भोवऱ्यातही अडकल्या. इंडस्ट्रीतील अनेकांबरोबर त्यांचे वाद झाल्याचं म्हटलं जातं. यामध्ये हृतिक रोशन, करण जोहर अशा अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींचा समावेश आहे.

न्यूज १८च्या वृत्तानुसार हृतिक रोशननंतर अभिनेत्री कंगना रणौत यांचं दिग्दर्शक-निर्माता करण जोहर याच्याशीही वाद झाला होता. २०१७ मध्ये ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात सहभागी झालेल्या कंगना यांनी करण जोहर यांना “घराणेशाहीचा (नेपोटिझमचा) झेंडा हाती घेणारे” असं म्हटलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये नेपोटिझमवर मोठी चर्चा सुरू झाली. सुरुवातीला करण जोहरने हा आरोप फेटाळून लावला होता. मात्र, त्यानंतर अनेक मुलाखती, सोशल मीडियावरील पोस्ट आणि विविध कार्यक्रमांमधून दोघांमधील शाब्दिक वाद अनेक वर्षे सुरू होते.

हृतिक, करणनंतर कंगना यांचे ‘या’ सेलिब्रिटींबरोबर झालेले वाद

कंगना रणौत यांनी अनेकदा अभिनेत्री आलिया भट्टवर घराणेशाहीचा फायदा झाल्याचा आरोप केला. तसेच, चित्रपटसृष्टीतील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आलिया मौन बाळगते, अशी टीकाही त्यांनी केली. कंगना यांनी आलियाच्या अभिनयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तिच्या स्वतंत्र ओळखीवरही भाष्य केलं. इतकंच नव्हे तर ‘मणिकर्णिका’ चित्रपटाकडे आलियाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचाही आरोप त्यांनी केला होता. याशिवाय ‘कॉफी विथ करण’मध्ये आलियाने पृथ्वीराज चौहान यांच्याबाबत दिलेल्या चुकीच्या उत्तराची खिल्ली उडवत कंगना यांना त्याला “डंब शॉट ऑफ कॉफी” अशी उपमा दिली होती. दुसरीकडे, आलिया भट्टने या आरोपांवर सार्वजनिकरीत्या प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, कंगना रणौत यांनी वेळोवेळी आलियाच्या करिअरमधील निर्णयांवर आणि करण जोहर यांच्याशी असलेल्या तिच्या जवळच्या नात्यावर टीका केली.

कंगना रणौत यांनी अनेकदा सोशल मीडियावरून अभिनेत्री तापसी पन्नूवर टीका केली. त्यांनी तापसीला “बी-ग्रेड अभिनेत्री” आणि “माझी स्वस्त प्रत (चिप कॉपी)” असं म्हटलं होतं. मात्र, तापसी पन्नूने सातत्याने याकडे दुर्लक्ष केलं आणि खासगी टीका-टिप्पणीमध्ये पडणं पसंत नसल्याचं स्पष्ट केलं. याशिवाय, घराणेशाहीवरील वाद आणि अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर सुरू झालेल्या चर्चेदरम्यानही कंगना यांनी तापसीवर निशाणा साधला होता.

कंगना रणौत यांनी स्वरा भास्करवरही टीका केली होती. राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवरील परस्परविरोधी भूमिकांमुळे दोघींमध्ये मतभेद निर्माण झाले. हे मतभेद पुढे सोशल मीडियावरही दिसून आले. कंगना रणौत यांनी स्वराच्या वैचारिक भूमिका आणि सार्वजनिक वक्तव्यांवर अनेकदा टीका केली. त्यावर स्वरा भास्करनेही कंगना यांच्या वक्तव्यांवर प्रश्न उपस्थित करत प्रत्युत्तर दिलं. यामुळे दोघींमधील वैचारिक संघर्ष अनेक वर्षे सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरला. स्वराबरोबर कंगना रणौत यांनी अभिनेत्री दीपिका पादुकोणवर अनेकदा सार्वजनिकपणे टीका केली आहे. सुरुवातीला पुरस्कार सोहळ्यांमधील घडामोडींवरून दोघींमध्ये मतभेद झाले, त्यानंतर दीपिका डिप्रेशनचा व्यवसाय पुढे नेत असल्याचा आरोपही कंगना यांनी केला होता. याशिवाय, दीपिका आपली एअरपोर्ट फॅशन आणि काही चित्रपटांची निवड कॉपी करत असल्याचाही दावा कंगना यांनी केला होता. २०२० मध्ये दीपिका पदुकोण यांनी जेएनयूला दिलेल्या भेटीनंतर हा वाद पुन्हा चर्चेत आला. त्या भेटीवर कंगना यांनी उघडपणे टीका केली आणि त्यामुळे दोन्ही अभिनेत्रींमधील दुरावा आणखी वाढल्याचं मानलं गेलं.

कंगना रणौत यांनी अभिनेता रणबीर कपूरवर अनेकदा टीका केली आहे. समाजात मोठा प्रभाव असूनही रणबीर राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर मौन बाळगतो, अशी टीका त्यांनी केली होती. भारतात अनेक लोक वीज, पाणी यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करत असताना विशेषाधिकार असलेले कलाकार मात्र यावर बोलणं टाळतात, असंही त्या म्हणाल्या होत्या. याशिवाय, कंगना यांनी रणबीरच्या ‘अॅनिमल’ चित्रपटावरही टीका केली होती. अलीकडेच त्यांनी ‘रामायण’ चित्रपटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत कलाकारांची निवड आणि सर्जनशील निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले.

जावेद अख्तर यांच्याशी झालेला कंगना रणौत यांचा वादही हृतिक रोशन प्रकरणाशी जोडला गेला होता. कंगना यांनी आरोप केला होता की, जावेद अख्तर यांनी त्यांच्या घरी बोलावून हृतिक रोशनची माफी मागण्यासाठी दबाव टाकला होता. मात्र, जावेद अख्तर यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत कंगना रणौत यांच्याविरोधा अब्रूनुकसानीचा (मानहानीचा) दावा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणात दोघांमध्ये दीर्घकाळ कायदेशीर लढाई सुरू राहिली. यानंतर अभिनेत्री कंगना रणौत यांनी अभिनेता विक्रांत मेस्सीवरही अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. २०२४ मध्ये विक्रांतने कंगना यांच्या अभिनयाचं कौतुक करत त्यांना “उजव्या विचारसरणीचं प्रतीक (Right-wing icon)” असं संबोधलं होतं. यानंतर कंगना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे प्रतिक्रिया देताना विक्रांतचा उल्लेख “झुरळ (cockroach)” असा केला होता. त्याचबरोबर त्यांनी बॉलिवूडमधील वातावरणावरही टीका केली होती. विक्रांत मॅस्सीने यानंतर वाद वाढवला नाही. मात्र, कंगना यांच्या या टिप्पणीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती.

दिग्दर्शक-निर्माते महेश भट्ट यांच्याबरोबरही कंगना रणौत यांचं बिनसलं होतं. हे प्रकरण बॉलिवूडमधील “मूव्ही माफिया” आणि घराणेशाहीवर केलेल्या टीकेनंतर अधिक चर्चेत आलं. कंगना यांनी आरोप केला होता की, महेश भट्ट यांनी पूर्वी तिच्या करिअरमधील काही निर्णयांना विरोध केला होता. तसंच, एका चित्रपटात काम करण्यास नकार दिल्यानंतर महेश भट्ट यांनी आपल्यावर चप्पल फेकली होती, असाही गंभीर आरोप कंगना यांनी केला होता. मात्र, महेश भट्ट यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर मुलाखती आणि सार्वजनिक वक्तव्यांमधून दोघांमधील हा वाद वेळोवेळी पुन्हा चर्चेत येत राहिला.