Kangana Ranaut comment on Girija Oak national crush tag : मराठी चित्रपटसृष्टीनंतर बॉलीवूडकडे वळालेली अभिनेत्री गिरिजा ओक ही ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाते. मराठमोळं सौंदर्य असलेल्या गिरिजाचे संपूर्ण देशात फॅन फॉलोविंग आहेत. काही दिवसांपूर्वी तिचा निळ्या साडीतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. यातील मोहक आणि दिलखेचक अंदाज नेटकऱ्यांना भावला होता. यामुळे ‘नॅशनल क्रश’ म्हणून मिळालेल्या लोकप्रियतेबद्दल गिरिजाने एका मुलाखतीमध्ये मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांनीही यावर मिश्कील टिप्पणी केली आहे.
अभिनेत्री कंगना रणौत यांच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटामध्ये गिरिजा ओक प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गिरिजा ओकने तिच्या नॅशनल क्रश असण्यावर भाष्य केले आहे. यामध्ये तिची नॅशनल क्रश टॅगमध्ये कोणतीही मेहनत नसल्याचे मत गिरिजाने व्यक्त केले. ती म्हणाली की, माझा निळ्या साडीतील तो पॉडकास्टमधील व्हिडीओ व्हायरल झाला. मी कशाबद्दल तरी सांगत होते आणि त्यातील एक क्लिप व्हायरल झाली. पण, ते व्हायरल होणे याला काही लॉजिक नाही. मला नॅशनल क्रश म्हणण्यात आले, पण यामध्ये माझी कोणतीही मेहनत नाही, असे मत गिरिजा ओकने व्यक्त केले.
यामध्ये माझी काही मेहनत नाही – गिरीजा
पुढे ती म्हणाली, “नॅशनल क्रश असणे याला काही कोणते सर्टिफिकेट नाही. कंगना रणौत यांना देशपातळीवर ओळख मिळणे वेगळी गोष्ट आहे, पण मला माझ्या कामावरून नाही तर दिसण्यावरून ‘नॅशनल क्रश’ म्हणण्यात आले. पण, यामध्ये माझी काही मेहनत नाही. मी जे दिसते ते तर मला आई-वडिलांकडून मिळाले आहे. सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे मला फक्त हे ‘नॅशनल क्रश’ म्हणण्यात आले,” असे अभिनेत्री गिरिजा ओकने सांगितले.
कंगना राणौतची मिश्किल टिप्पणी
या मुलाखतीमध्ये अभिनेत्री कंगना रणौत यांनी, हे ब्लू साडी गर्ल काय प्रकरण आहे याबद्दल विचारले. यावर गिरिजाने व्हायरल झालेल्या व्हिडीओबद्दल सांगितले. तसेच तिला सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ बोलले जात असल्याचे नमूद केले. यावर कंगनाने मिश्कील टिप्पणी केली. कंगना रणौत म्हणाल्या, “चांगली गोष्ट आहे, तुझ्या सौंदर्याचा वापर आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कर,” कंगनाच्या या मिश्कील प्रतिक्रियेनंतर उपस्थित सर्वजण जोरदार हसू लागले.
‘भारत भाग्य विधाता’ कधी होणार रिलीज?
अभिनेत्री कंगना रणौत यांचा ‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट येत्या १२ जून रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज तापडिया यांनी केले आहे. यामध्ये अभिनेत्री कंगना रणौतसह गिरिजा ओक, स्मिता तांबे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट मुंबईमध्ये झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्यानंतर कामा हॉस्पिटलमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. यात अभिनेत्री कंगनाने नर्सची भूमिका साकारली आहे.
