Kangana Ranaut : बॉलीवूड अभिनेत्री कंगणा रणौत कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहत असते. जानेवारी महिन्यात तिचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात अभिनेत्रीने माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली होती. कंगणाच्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांची अपेक्षा होती. पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यात चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच ‘इमर्जन्सी’ वादात सापडला होता. अशातच आता या संदर्भात कंगणा पुन्हा अडचणीत सापडली आहे.
‘इमर्जन्सी’ चित्रपटामुळे कंगना राणौत कायदेशीर अडचणीत सापडली आहे. ज्येष्ठ पत्रकार आणि ‘द इमर्जन्सी: अ पर्सनल हिस्ट्री’ या पुस्तकाच्या लेखिका कुमी कपूर यांनी चित्रपट निर्मात्यांविरुद्ध खटला दाखल केला आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, कपूरने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स प्रायव्हेट लिमिटेड प्रॉडक्शन हाऊस आणि ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर त्यांच्या पुस्तकाचा आणि नावाचा गैरवापर केल्याचा आणि चित्रपटात ऐतिहासिक तथ्ये बदलल्याचा आरोप केला आहे.
कुमी कपूर यांचा दावा आहे की, त्यांनी ‘मणिकर्णिका फिल्म्स’ आणि ‘पेंग्विन रँडम हाऊस’बरोबर एक करार केला होता; ज्यामुळे त्यांना त्यांचे पुस्तक एका फीचर फिल्ममध्ये रूपांतरित करण्याची परवानगी मिळाली होती. पण त्यांचं असं म्हणणं आहे की, या कराराचे स्पष्टपणे उल्लंघन झाले आहे. त्या करारानुसार, चित्रपट निर्मात्यांना आशयाचे सर्जनशील रूपांतर करण्याचा अधिकार होता. ‘द इमर्जन्सी: अ पर्सनल हिस्ट्री’ हे पुस्तक २०१५ मध्ये प्रकाशित झाले होते.
कुमी कपूर यांनी चित्रपट निर्मात्यांवर तथ्य आणि ऐतिहासिक घटनांमध्ये बदल केल्याचा आरोप केला आहे. याबद्दल त्या म्हणाल्या की, “माझी मुलगी वकील आहे. म्हणूनच तिच्या सल्ल्यानुसार मी करारात दोन कलम समाविष्ट केले. यानुसार, निर्मात्यांना चित्रपट बनवण्याचे पूर्ण कलात्मक स्वातंत्र्य आहे, परंतु सार्वजनिकरित्या उपलब्ध असलेल्या ऐतिहासिक तथ्यांच्या विरुद्ध असलेले कोणतेही बदल त्यात केले जाऊ नयेत.”
त्याचबरोबर कुमी कपूर यांच्या मते, “करारात असेही नमूद करण्यात आले होते की, लेखकाचे आणि पुस्तकाचे नाव चित्रपटाच्या प्रमोशनसाठी किंवा कमाईसाठी पूर्व लेखी संमतीशिवाय वापरले जाऊ शकत नाही. मी गोव्यात होते आणि त्यावेळी मी चित्रपट पाहिला नव्हता. मला खात्री होती की, निर्माते आमच्यातील करारानुसार निर्णय घेतील. पण ते अजूनही असा दावा करत आहेत की, हा चित्रपट पुस्तकावर आधारित आहे.”
कुमी कपूर यांनी पुढे असेही निदर्शनास आणून दिले की, चित्रपट निर्मात्यांनी ३ एप्रिल रोजी पाठवलेल्या कायदेशीर नोटीसला प्रतिसाद दिला नाही. कंगनाच्या टीम किंवा नेटफ्लिक्सकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने त्यांनी हा खटला सुरू केला आहे. या चित्रपटामुळे त्यांची प्रतिष्ठा आणि व्यावसायिक हानी झाली आहे. यामुळे त्या भावनिक, आर्थिक आणि कायदेशीर नुकसानाबद्दल भरपाई मागत आहेत.
दरम्यान, कंगणाचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट १७ जानेवारी २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातून १९७५ ते १९७७ या काळात इंदिरा गांधींनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळाबद्दल भाष्य करण्यात आलं होतं. या चित्रपटात कंगनाने केवळ इंदिरा गांधींची मुख्य भूमिकाच नाही, तर दिग्दर्शन आणि सह-निर्मितीदेखील केली आहे. शिवाय या चित्रपटात तिच्यासह अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण आणि इतर कलाकारांचाही समावेश आहे.