कंगना रणौत त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जातात. अनेकदा त्या सोशल मीडियावरुन किंवा माध्यमांशी संवाद साधताना त्यांची मत, प्रतिक्रिया ठामपणे मांडत असतात, पण अनेकदा यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यातही अडकतात. आता पुन्हा एकदा कंगना अनेकांच्या चर्चेचा आणि वादाचा विषय बनल्या आहेत.
भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी नुकत्याच जेन-झी पिढीबाबत केलेल्या ‘गटर जनरेशन’ या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर आता सोशल मीडियावर त्यांचा २०१८ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या आफ्टर-पार्टीतील एक जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये कंगना पार्टीचा आनंद घेताना दिसत आहेत.
कंगना यांचा कोणता व्हिडीओ व्हायरल झाला?
हा व्हिडीओ पुन्हा चर्चेत येण्याचं कारण म्हणजे कंगना यांनी कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) प्रवक्ते सौरव दास यांच्यावर इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे केलेली टीका. सौरव यांनी कंगना यांच्या Gen Z संदर्भातील वक्तव्यावर आणि सीजेपीने केलेल्या नीट पेपर फुटीसंदर्भातील आंदोलनावरील त्यांच्या भूमिकेवर टीका केली होती. कंगना रणौत यांनी आंदोलन आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्यांवर इन्स्टाग्राम स्टोरीज व पोस्टद्वारे केलेल्या टीकेदरम्यान त्यांचा २०१८ मधील कान्स फिल्म फेस्टिव्हलचा एक जुना व्हिडीओ पुन्हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘तनु वेड्स मनू’ फेम कंगना या व्हिडीओमध्ये काळ्या सिक्विन ड्रेस आणि निळ्या स्कार्फमध्ये दिसत आहेत. त्या पार्टीत नाचताना, मजा करताना आणि उत्साहात सहभागी झालेल्या दिसत असल्याने हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे. काही नेटकऱ्यांनी कंगना यांना ट्रोल करत, त्यांच्या सध्याच्या वक्तव्यांशी या व्हिडीओतील बेधडक आणि मोकळ्या पणाने वागणं कसं विरुद्ध आहे हे सांगत टीका केली. तर दुसरीकडे, अनेकांनी कंगना यांचं समर्थन केलं. पार्टी करणं यात काहीच गैर नाही. जोपर्यंत कुणाला त्रास दिला जात नाही किंवा गैरवर्तन केलं जात नाही, तोपर्यंत प्रत्येकाला आनंद साजरा करण्याचा अधिकार आहे. अशा प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. त्यामुळे या व्हिडीओवरून सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
दरम्यान, कंगना रणौत यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांवरही कठोर टीका केली, ज्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्या. कंगना यांनी स्वतःला पाश्चात्त्य विचारसरणीची भारतीय महिला म्हणवणाऱ्या महिलांवर निशाणा साधत, त्या भारतीय पारंपरिक मूल्यांच्या विरोधात जाणारी जीवनशैली स्वीकारत असल्याचा आरोप केला. तसेच, त्या घरगुती जबाबदाऱ्या पार पाडण्यासही तयार नसल्याचं त्यांनी म्हटलं. पोस्टमध्ये कंगना म्हणाल्या, “मी त्यांना ‘जनरेशन गटर’ म्हणते. यापैकी काही जणी व्यवस्थेला काहीही योगदान देऊ शकत नाहीत. त्या अभ्यासात चांगल्या नाहीत. इतक्या कुरूप आणि भ्रष्ट आहेत की, चांगल्या गृहिणीही बनू शकत नाहीत.” कंगना यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून अनेकांनी त्यांच्या भाषेवर आणि महिलांबाबत केलेल्या टिप्पणीवर आक्षेप घेतला आहे.
