Kangana Ranaut Hrithik Roshan Dispute : भाजपा खासदार व अभिनेत्री कंगना रणौत यांनी नीट पेपरफुटी आंदोलन करण्याऱ्या तरुण आंदोलकांवर केलेल्या वक्तव्यांमुळे त्या चर्चेमध्ये आल्या आहेत. सोशल मीडियावर त्यांनी या तरुण मुला-मुलींच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यावरून वाद सुरू असताना हृतिक रोशनचे नाव आले असून, अनेक मीम्स तयार केले जात आहेत. सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांनीही हृतिक रोशनचा उल्लेख केला होता. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या यातील एका पोस्टवर अभिनेता हृतिकने प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पुन्हा एकदा हृतिक रोशन व कंगना रणौत यांच्यातील जुना वाद उफाळून आला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये कंगना रणौत यांचा एक्स बॉयफ्रेंड हृतिक रोशनचे नाव घेतले जात आहे. त्यावर कमेंट करीत हृतिक रोशनने प्रतिक्रिया दिली. त्याच्या या प्रतिक्रियेवर कंगना रणौत यांनी उत्तर दिले आहे. यावरून दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद-विवाद सुरू झाल्याचे दिसून येत आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत कंगनाने हृतिकला उत्तर दिले आहे. त्यामध्ये त्यांनी हृतिकची गर्लफ्रेंड सबा आझाद हिचाही उल्लेख केला आहे.

काय आहे कंगना यांची पोस्ट?

कंगना रणौत यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत लिहिले, “प्रिय हृतिक, तुला तुझी योग्य जोडीदार सबा आझाद भेटली आहे, याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही दोघं एकत्र नेहमीच चांगले दिसता; पण तू एका कमिटेड रिलेशनशिपमध्ये असताना, एखाद्या स्त्रीबद्दल अशी वक्तव्य करणं, हे तुला शोभत नाही. उलट, जे लोक तुझं नाव वापरून माझा अपमान करीत आहेत आणि मला त्रास देत आहेत, तू त्यांचा विरोध केला पाहिजे.”

पुढे त्यांनी लिहिलं, “आगीत तेल ओतणं आणि तुझ्या जोडीदाराला लाजवेल अशी वक्तव्य करणं थांबव. तू समजूतदारपणा दाखवशील आणि अशा प्रकारच्या गरज नसलेल्या टिप्पणी करणं थांबवशील, अशी अपेक्षा आहे,” अशा आशयाची पोस्ट कंगना रणौत यांनी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हृतिक रोशनने केलेल्या वक्तव्यांवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

कंगना रणौत इन्स्टाग्राम स्टोरी

काय म्हणाला होता हृतिक रोशन?

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर फ्रेडी बर्डीने “संपूर्ण जगानं हृतिक रोशनची माफी मागायला हवी,” अशी पोस्ट केली होती. त्याच्या या व्हायरल पोस्टवर हृतिक रोशननेही कमेंट केली होती. हृतिक लिहिलं, “आपल्या समाजात एक मोठी समस्या वाढत चालली आहे. एक व्यक्ती अजिबातच आवडत नाही म्हणून दुसऱ्याची बाजू घेता, ही तर एक समस्या झाली आहे. योग्य संदर्भ आणि वस्तुस्थिती समोर आल्यानंतर लोकांनी मत मांडावं. मी त्याची वाट बघेन आणि खरं तर तेच योग्य राहीन. पण खरं तर आता त्याची कोणाला गरज आहे?” अशा आशयाची कमेंट हृतिक रोशनने केली होती.

हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यातील वाद

हृतिक रोशन आणि कंगना रणौत यांच्यामध्ये २०१६ पासून वाद आहे. त्यांचा हा वाद बॉलीवूडमधील सर्वांत चर्चेत राहिलेल्या वादांपैकी एक आहे. एका मुलाखतीत कंगना यांनी हृतिकचा उल्लेख ‘माझा मूर्ख एक्स’, असा केल्यानंतर या वादाला सुरुवात झाली. त्यानंतर हृतिकने हे आरोप फेटाळत कंगना यांना कायदेशीर नोटीस पाठवून माफी मागण्याची मागणी केली होती. मग दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोप केले. कंगना यांनी ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता; तर हृतिकने तो कधीच प्रेमसंबंधात नसल्याचं मत व्यक्त केलं होतं. त्यानंतर आता अनेक वर्षांनंतर दोघांमध्ये पुन्हा एकदा वाद झाल्याचे दिसून आलं आहे.