Kangana Ranaut Pakistan Husband Old Video : भाजपा खासदार व अभिनेत्री कंगना रणौत या त्यांच्या वक्तव्यांमुळे सध्या चर्चेत आहेत. आता त्यांचा एका पाकिस्तानी टॉक शोमधील जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कंगना यांनी त्यांना कसा जोडीदार हवा आहे, ते सांगितलंय.
पाकिस्तानी सूत्रसंचालिका नादिया खान यांच्या टॉक शोमध्ये कंगना रणौत सहभागी झाल्या होत्या. या शोमधील त्यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये कंगना रणौत यांनी त्यांना कसा पती पाहिजे, याबाबत मत व्यक्त केलं आहे. यावेळी नादिया यांनी पाकिस्तानमधील मुलगा लग्नासाठी चालेल का याबाबत प्रश्न विचारल्यानंतर कंगना यांनी ‘मुलगा शोधून द्या’ म्हणत सहमती दर्शवली होती. तसेच शाकाहारी मुलगा नकोय, असेदेखील कंगना म्हणाल्या होत्या.
काय म्हणाल्या होत्या कंगना रणौत?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नादिया आणि कंगना या दोघी लग्नाविषयी आणि कसा मुलगा पाहिजे याविषयी बोलत आहेत. यामध्ये नादिया म्हणातात, “कंगना, तुला खूप मुलं लग्नासाठी विचारत आहेत, पण तुला पाकिस्तानमध्ये खूप चांगला मुलगा भेटेल; त्यामुळे हे तर तू मान्य करशील ना की तू पाकिस्तानमधील मुलगा लग्नासाठी शोधत आहेस. यावर कंगना रणौत म्हणाल्या की, ‘हो प्लीज, मला लग्नासाठी चांगला मुलगा शोधून द्या.'”
कंगना रणौत यांच्या अपेक्षा काय होत्या?
यापुढे नादिया यांनी कंगना यांना विचारलं की, ‘तुला लग्नासाठी कसा मुलगा हवा आहे?’ यावर त्या म्हणतात, “नात्यामध्ये प्रेम पाहिजे, कारण माझ्यासाठी पैसे महत्त्वाचे नाहीत. मी अशी मुलगी आहे, जिने फार कमी वयामध्ये यश मिळवले असून कमी वयात खूप पैसा पाहिला आहे. मला पैसा कसा कमवायचा हे माहीत आहे, त्यामुळे माझ्यासाठी पैसे हा सगळ्यात शेवटचा मुद्दा आहे. असा एखादा मुलगा, ज्याचे वय ३०च्या आसपास असेल आणि त्याला माझ्याबद्दल जास्त काही माहीत नसेल तरी चालेल. कारण मला माझ्या पतीबरोबर खूप साधं आयुष्य जगायचं आहे. आता इतर गोष्टी मी तुम्हाला नंतर सांगेन, कारण त्या टीव्हीवर सांगण्यासारख्या नाहीत.”
मुघलाई पदार्थ बनवता येतात – कंगना रणौत
पुढे नादिया म्हणातात की, “आता तुम्हाला पाकिस्तानमधून स्थळ मिळणार हे तर नक्की आहे. सानिया मिर्झानंतर आता कंगना पाकिस्तानचा मुलगा बघणार आहे. कंगना म्हणाल्या, ‘मला जोडीदाराबरोबर अगदी सामान्य आयुष्य जगायचं आहे. मला शाकाहारी मुलगा नकोय. कारण मी खूप छान चिकन, चिकन कोरमा, चिकन मखनी यांसारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या करी बनवते… मला सर्व प्रकारचे भारतीय आणि मुघलाई पदार्थ बनवता येतात. इडली-डोसा मला येत नाही, कारण आम्ही कधीच ते बनवलं नाही. मी उत्तर भारतातून येते, त्यामुळे हे पदार्थ जास्त माहीत नाहीत.'”
सोनाक्षी सिन्हावर केली अप्रत्यक्षरीत्या टीका
सोशल मीडियावर खासदार कंगना रणौत यांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर अप्रत्यक्षरीत्या टीका केली होती. सोनाक्षीने मुस्लीम अभिनेता झहीर इकबालबरोबर लग्न केलं आहे. इन्स्टाग्रामवर कंगना यांनी व्हिडीओ शेअर करीत सोनाक्षीचं नाव न घेता मत व्यक्त केलं होतं. कंगना म्हणालेल्या, “एका हिंदू मुलीनं मुस्लीम पुरुषाशी लग्न केल्यानंतर तिचे विचार आणि श्रद्धा बदलल्या. चित्रपटसृष्टीतील अनेक हिंदू मुलींना मी जवळून पाहिलं आहे आणि मी त्यांना ओळखते. त्या हिंदू असल्या तरी राजकारणाबाबत त्यांची ठाम भूमिका नसते, त्या साधारणपणे तटस्थ असतात.”
