अभिनेत्री कंगना रणौतच्या ‘पंगा’, ‘थलायवी’, ‘धाकड’ अशा काही चित्रपटांना प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी तिचे हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. ती सध्या ‘इमर्जन्सी’ या तिच्या आगामी चित्रपटाच्या कामांमध्ये व्यस्त आहे. ८० च्या दशकातल्या भारताची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटामध्ये ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिच्यासह चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे, अनुपम खेर, मिलिंद सोमण आणि सतीश कौशिक हे कलाकार काम करणार आहेत. या निमित्ताने कंगनाने अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मिती अशी तिहेरी जबाबदारी सुद्धा उचलली आहे.

सध्या सगळीकडे ‘कांतारा’ या कन्नड चित्रपटाची चर्चा आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वी हा चित्रपट पाहिला. तिने सोशल मीडियाद्वारे चित्रपटाचे आणि रिषभ शेट्टी यांचे कौतुक केले. त्यानंतर तिने हा चित्रपट पुढच्या वर्षी ऑस्करसाठी पाठवला जावा असे वक्तव्य केले होते. मागच्या काही वर्षांमध्ये ‘बॉलिवूड विरुद्ध दाक्षिणात्य चित्रपट’ असा वाद सुरु आहे. एका कार्यक्रमामध्ये कंगना रणौतने या मुद्द्यावर भाष्य केले.

आणखी वाचा – ‘आदिपुरुष’चे दिग्दर्शक ओम राऊत आणि रणवीर सिंग एकत्र येणार? चर्चा होतीये एका मोठ्या चित्रपटाची

पंचायत आजतक या कार्यक्रमामध्ये ती “दाक्षिणात्य लोक आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत. तेथे आपल्या धर्माला विशेष महत्त्व दिले जाते. त्यांच्यामुळे हा चांगला संदेश देशभरात पसरला असून बाकीचे लोक त्यांचे अनुकरण करत आहेत. याउलट बॉलिवूडमधल्या लोकांना संस्कृतीचा विसर पडला आहे”, असे म्हणाली.

आणखी वाचा – वैतागलेला रणबीर कपूर कॅमेऱ्यासमोरुन निघून गेला अन् अयान मुखर्जी पाहतच राहिला, नेमकं काय घडलं

ती पुढे म्हणाली, “सध्या बॉक्स ऑफिसवर हिट होणारे चित्रपट भारतीय संस्कृतीशी जोडलेले आहेत. ‘कांतारा’, ‘पोन्नियिन सेल्वन’ असे बिगबजेट चित्रपट आपल्या देशातल्या परंपरांवर-इतिहासावर आधारलेले आहेत. बॉलिवूडवरचा पाश्चिमात्य प्रभाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे लक्षात येत आहे. याच धर्तीवरचे माझे चित्रपटही फ्लॉप झाले. त्यातून मी शिकवण घेतली आहे. २०१४ नंतर देशभरात सकारात्मक बदल झाला आहे. मी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिथल्या चित्रपटांमध्ये भारतीयत्वावर भर दिली जाते. यामुळेच ‘आरआरआर’ सारखा चित्रपट सातासमुद्रापार किर्ती करु शकला.”