Tejas Trailer: कंगना रणौत ही बॉलिवूडमधील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे जी सतत काही ना काही कारणास्तव चर्चेत असते. चित्रपट असो किंवा राजकीय मत कंगना अगदी स्पष्टपणे सगळीकडे व्यक्त होते. नुकतंच कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तिचा आगामी चित्रपट ‘तेजस’चा टीझर शेअर केला होता अन् चित्रपटाचा ट्रेलरच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली होती.
सांगितल्याप्रमाणे ८ ऑक्टोबर म्हणजेच इंडियन एयर फोर्सनिमित्त सकाळी कंगनाने ‘तेजस’चा ट्रेलर शेअर केला आहे. कंगनाचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट बघत होते, काही कारणास्तव हा चित्रपट सतत लांबणीवर पडत होता पण आता प्रतीक्षा संपली आहे. चित्रपटात कंगना एका डॅशिंग भूमिकेत दिसत आहे.
आणखी वाचा : ‘मिशन राणीगंज’च्या कमाईत अनपेक्षित वाढ; दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर कमावले ‘इतके’ कोटी
हा चित्रपट एयर फोर्स पायलट तेजस गिलच्या जीवनावर बेतलेला आहे. ट्रेलरमध्ये कंगना तेजसच्या भूमिकेत अगदीच चपखल बसत असल्याचं जाणवत आहे. चित्रपटात जबरदस्त संवाद, अॅक्शन आणि एक इमोशनल ड्रामा पाहायला मिळणार हे ट्रेलरवरुन स्पष्ट होत आहे. याबरोबरच ट्रेलरमधून देशभक्ती आणि दहशतवादाविषयी केलेलं भाष्य हे या चित्रपटासाठी फार महत्त्वाचं ठरणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
एका भारतीय गुप्तहेराला दहशतवादींच्या तावडीतून सोडवण्याच्या एका मिशनवर या चित्रपटाची कथा बेतली आहे. याबरोबरच ‘तेजस’ हा भारताचा पाहिलं एरियल अॅक्शन चित्रपट असल्याचा दावादेखील केला जात आहे. रॉनी स्क्रूवाला निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सर्वेश मेवाडा यांनी केलं आहे. पहिले हा चित्रपट २०२० मध्येच प्रदर्शित होणार होता, पण कोविड आणि नंतर काही व्हीएफएक्सच्या कामामुळे चित्रपट लांबणीवर पडला. आता अखेर ‘तेजस’ २७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.