Emergency Movie : बॉलीवूडच्या क्विन आणि भाजपच्या खासदार कंगना रणौत यांच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाची चर्चा गेल्या वर्षभरापासून रंगली आहे. बॉलीवूडच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक ‘इमर्जन्सी’ चित्रपट आहे. या चित्रपटात कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. अशातच निर्मात्यांनी आज ‘इमर्जन्सी’च्या ट्रेलर प्रदर्शनाची आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. १४ ऑगस्टला कंगना रणौत यांच्या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगना यांनी चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करत लिहिलं आहे, “भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळ्या दिवसाचा साक्षीदार व्हा. सत्तेच्या लालसेने ज्यांनी संपूर्ण देश जाळून टाकला….१४ ऑगस्टला ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होत असून भारतीय लोकशाहीचा काळा अध्याय आणि आणीबाणीची विस्फोटक कथा ६ सप्टेंबरला जगभरातील चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळणार आहे.”

हेही वाचा – Video: सूर्याच्या ‘कंगुवा’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रदर्शित, बॉबी देओलच्या खतरनाक लूकने सगळ्यांचं वेधलं लक्ष

दरम्यान, लोकसभा निवडणुकीमुळे ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली होती. याआधी १४ जूनला ‘इमर्जन्सी’ प्रदर्शित होणार होता. पण लोकसभा निवडणुकीत कंगना यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा निवडणुकीचं तिकिट त्यांना मिळालं. त्यामुळे यावेळी कंगना प्रचारात आणि मतदारसंघातील कामात व्यग्र होत्या. अखेर आता ६ सप्टेंबरला ‘इमर्जन्सी’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा – “मला बिग बॉसच्या घरात…”, पहिल्याच आठवड्यात बेघर झालेले पुरुषोत्तमदादा पाटील यांची भावुक पोस्ट, म्हणाले…

‘इमर्जन्सी’ या बहुचर्चित चित्रपटात कंगना रणौत यांच्यासह अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण असे अनेक कलाकार झळकणार आहेत. याआधी कंगना यांचा ‘तेजस’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण बॉक्स ऑफिसवर पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे फ्लॉप ठरला. आता ‘इमर्जन्स’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.