गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आणि मंडी लोकसेभच्या सदस्य कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट मोठा चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉंचसोहळा नुकताच पार पडल्याचे पाहायला मिळाले होते. ६ सप्टेंबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्याची तारीख जाहीर करण्यात आली होती, मात्र आता सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या अधिकाऱ्यांनी चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यास वेळ लागू शकतो, असे स्पष्ट केले आहे.

मोहालीच्या स्थानिकांनी चित्रपटाला मिळालेल्या प्रमाणपत्राविरुद्ध पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीसाठी शनिवारी केंद्र सरकार आणि सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनच्या वतीने ॲडिशनल सॉलिसिटर जनरल (ASG) सत्यपाल जैन यांनी हजेरी लावली होती. त्यांनी आपला पक्ष मांडताना स्पष्ट केले, “चित्रपटाला प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नसून, ज्यांना या चित्रपटाबाबत सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडे निवेदन द्यायचे आहे, ते देऊ शकतात. शीख समुदायासह सर्व समुदायांच्या भावना बोर्ड लक्षात घेईल, असे सत्यपाल जैन यांनी म्हटले. शनिवारी या प्रकरणाचा निकाल लागला.

काय म्हणाले अधिकारी?

द इंडियन एक्स्प्रेसबरोबर बोलताना सत्यपाल जैन यांनी सांगितले, ” ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रमाणपत्रासाठी सीबीएफसीकडे एक अर्ज दाखल केला आहे, ज्यावर प्रक्रिया सुरू असून त्यावर अद्याप बोर्डाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. आम्ही सर्वांना आश्वासन देऊ इच्छितो की, अंतिम निर्णय घेताना आम्ही शीख समुदायासह सर्व समुदायांच्या भावना लक्षात ठेवू. सर्व सूचना आणि प्रतिनिधींचे स्वागत आहे”, असे सत्यपाल जैन यांनी म्हटले आहे.

सीबीएफसीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील मुद्दा असल्याने या चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्यास आणखी वेळ लागू शकतो. ६ सप्टेंबर ही चित्रपट प्रदर्शित करण्याची निर्मात्यांनी तारीख जाहीर केली आहे, त्यापेक्षा वेळ होऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे. एका अधिकाऱ्याने म्हटले, “चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तारखेशी आमचा काहीही संबंध नाही. चित्रपटाला प्रमाणपत्र मिळण्याआधीच चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली आहे”, असे त्यांंनी म्हटले आहे.

हेही वाचा: “म्हणून मी गाणं शिकायचं सोडलेलं”, अभिजीत सावंतचा खुलासा; म्हणाला, “मला ते…”

शुक्रवारी कंगना रणौत यांनी “चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिली होती, मात्र सीबीएफसीला धमकी मिळाल्याने चित्रपटाचे प्रमाणपत्र रोखण्यात आले”, असे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा पार पडला. यावेळी ६ सप्टेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले होते. हा चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आयुष्यावर बेतलेला आहे. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत कंगना रणौत दिसणार असून दिग्गज अभिनेते अनुपम खेर आणि श्रेयस तळपदे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. श्रेयस तळपदे अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलर लॉंचवेळी या भूमिकेविषयी बोलताना श्रेयसने म्हटले, “ज्यावेळी कंगना रणौत यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या भूमिकेसाठी मला विचारले होते, त्यावेळी त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी, हे मला कळत नव्हते. त्यांनी मला कोणत्या भूमिकेसाठी विचारले आहे, हा प्रोजेक्ट घ्यावा की सोडून द्यावा, असा विचार मी करीत होतो. कारण मी गोंधळलेला आणि घाबरलेला होतो”,असेही अभिनेत्याने म्हटले आहे.

आता कंगना रणौत यांचा ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.