Kangana Ranaut on The Diary of West Bengal Director Missing Case: ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ या वादग्रस्त चित्रपटाचे दिग्दर्शक सनोज मिश्रा कोलकातामधून बेपत्ता झाले आहेत. १४ ऑगस्टपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांना कोलकाता पोलिसांनी त्यांच्या चित्रपटाशी संबंधित चौकशीसाठी बोलावले होते. पण कोलकात्यात आल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला. याप्रकरणी अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांनी ममता बॅनर्जींकडे मदत मागितली आहे.
कंगना रणौत यांची पोस्ट –
कंगना रणौत यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये सनोज मिश्रा यांचा फोटो शेअर करत लिहिलं, “हे सनोज कुमार मिश्रा आहेत. त्यांनी द डायरी ऑफ वेस्ट बंगाल या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर ममता बॅनर्जी सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. कोर्टात सुनावणीसाठी ते १४ ऑगस्टला कोलकात्याला गेले होते आणि तेव्हापासून बेपत्ता आहेत. त्यांची पत्नी मला रोज फोन करते. काल रात्रीपासून तिची अवस्था वाईट झाली आहे, ती बंगालला जाण्यासाठी निघाली आहे. मी ममता बॅनर्जी यांना विनंती करते की त्यांनी याप्रकरणी मदत करावी आणि त्यांच्या पतीचा शोध घ्यावा.”
‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’ हा चित्रपट ३० ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात पश्चिम बंगालमधील हिंसाचार दाखवण्यात आला आहे, त्यामुळे या चित्रपटाला काही ठिकाणी विरोध होतोय. त्याचबरोबर सनोज मिश्रा यांना जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. चित्रपटामुळे राज्याची प्रतिमा खराब होत असल्याचा आरोप करत पश्चिम बंगाल पोलिसांनी त्यांना कायदेशीर नोटीस बजावली होती.
कुठे आहे ‘मोहरा’तील ही अभिनेत्री? १८ वर्षांनी साध्वीच्या रुपात दिसली अन्…; आता करते ‘हे’ काम
सनोज मिश्रा अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचे कुटुंबीय खूप चिंतेत आहे. या चित्रपटामुळे धमक्या येत होत्या, त्याच प्रकरणात सनोज मिश्रा बेपत्ता झाले आहेत असं कुटुंबियांचं म्हणणं आहे. त्यांची पत्नी द्विती मिश्रा यांनी दोन दिवसांपूर्वी एबीपी लाईव्हला दिलेल्या मुलाखतीत पतीबद्दल चिंता व्यक्त केली होती. सनोज १४ ऑगस्टला सकाळी घरातून निघाले. दुपारी कोलकात्याला पोहोचल्यावर फोन करणार असं त्यांनी सांगितलं होतं, पण कोलकात्याला गेल्यावर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही, असं द्विती म्हणाल्या होत्या.
पती बेपत्ता असल्याची तक्रार द्विती यांनी गोमती नगर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १५ ऑगस्टच्या संध्याकाळी कोलकाता येथील एका मंदिराजवळ सनोज मिश्रा यांचा फोन काही काळासाठी चालू होता, पण नंतर तो बंद झाला.