Kangana Ranaut Post For Aishwarya Rai : बॉलीवूड अभिनेत्री व लोकसभा खासदार कंगना रणौत या त्यांच्या स्पष्टवक्तेपणा आणि बेधडक वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. सिनेविश्वातील नेपोटिझम आणि गटबाजी यांवर कंगना यांनी अनेकदा परखड भूमिका घेतली आहे. दरम्यान, कंगनाने अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनच्या समर्थनार्थ इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे. कान्समधील लूकवरून ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना कंगना यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. सौंदर्य, व्यक्तिमत्त्व व आत्मविश्वासासाठी ऐश्वर्याचे कौतुक करीत त्यांनी ट्रोलर्सवर निशाणा साधला आहे.
ऐश्वर्या रायचा कान्स लूक चर्चेत
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या राय-बच्चनने शेवटच्या दोन दिवसांत दिमाखदार उपस्थिती दाखवीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी ऐश्वर्याने वेगवेगळे स्टायलिश लूक सादर केले असून, तिच्या सौंदर्याचे अनेकांनी कौतुक केले. पहिल्या दिवशी ऐश्वर्याने अमित अग्रवाल यांनी डिझाईन केलेला निळ्या रंगाचा आकर्षक गाऊन परिधान केला होता. या लूकमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते.
कंगना रणौत यांची ऐश्वर्यासाठी पोस्ट
मात्र, सोशल मीडियावरील काही ट्रोलर्सनी तिच्या वाढलेल्या वजनावर आणि वयावरून टीका करीत तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
त्यावर कंगना रणौत यांनी ऐश्वर्याच्या समर्थनार्थ भूमिका घेत ट्रोलर्सना खडेबोल सुनावले. “ती तुम्हाला खूश करण्यासाठी कान्सला गेलेली नाही, असे लिहीत ऐश्वर्याची बाजू मांडली आहे.
काय आहे कंगना रणौतची पोस्ट?
कंगना रणौतने इन्टाग्राम स्टोरीमध्ये ट्रोलर्सला उत्तर देत लिहिले, “फॅशन आणि स्टाईल म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. प्रत्येक जण आपापल्या दृष्टीने आयुष्याकडे बघतो आणि स्वतःची ओळख तयार करतो. कोणत्याही महिलेला दुसऱ्यांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची काहीही गरज नाही,” असे म्हटले आहे. तसेच ऐश्वर्या रायच्या लूकचे कौतुक करीत कंगना यांनी लिहिले की, ऐश्वर्या खूपच सुंदर दिसतीये आणि ज्यांना ती अजून वेगळी दिसावी, असे वाटते आहे त्यांनी आधी स्वतःला नीट पाहावे. इथे ती कुणाला खूश करण्यासाठी आलेली नाही. जर रेड कार्पेटवर वयस्कर महिलांना पाहायची सवय नसेल, तर आता ती सवय करून घ्या, असे स्पष्ट मत कंगना रणौत यांनी सोशल मीडियावर व्यक्त केले आहे. त्यांनी ऐश्वर्याला ट्रोल करणाऱ्यांना स्पष्ट उत्तर दिले.

कंगना रणौत यांचे ‘क्वीन २’चे शूटिंग सुरु
कंगना रणौत या सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असून, राजकारणातही त्या सक्रिय आहेत. त्यांचा दोन दिवसांपूर्वी गळ्यात मंगळसूत्र घातलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होता. गळ्यात मंगळसूत्र व हातात हिरवा चुडा असल्याने अनेक जण गोंधळून गेले आणि जोरदार चर्चा सुरू झाली. गळ्यातील मंगळसूत्रामुळे त्यांनी गुपचून लग्न केलंय का, असेही काही जण बोलत होते. कंगना रणौत सध्या त्यांच्या ‘क्वीन २’ (Queen 2) या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. चित्रपटाचे शूटिंग मुंबईमध्ये सुरू असून, या चित्रपटाच्या शूटिंगसाठी त्यांनी गळ्यात मंगळसूत्र, हातामध्ये हिरवा चुडा, कपाळावर टिकली लावली असल्याचे समोर आले आहे.
