Kangana Ranaut slams Karan Johar : कंगना रणौत बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कंगना अभिनयासह राजकारणातही सक्रिय असून, त्या अनेकदा सामाजिक मुद्द्यांवर त्यांची मतं स्पष्टपणे मांडत असतात. त्याचबरोबर त्या बॉलीवूडमधील मुद्द्यांवरही अनेकदा ठामपणे प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच आता त्यांनी बॉलीवूडमधील काही लोकप्रिय दिग्दर्शक आणि अभिनेता सलमान खानबद्दलचं त्यांचं मत व्यक्त केलं आहे.
अलीकडेच हजेरी लावलेल्या एका वाहिनीच्या कार्यक्रमांमध्ये कंगना रणौत यांनी आदित्य धरचा ‘धुरंधर’, हॉलीवूडमधून आलेल्या ऑफर्स याबद्दलही मत व्यक्त केलं आहे. ‘न्यूज १८’शी संवाद साधताना यावेळी कंगना यांनी त्यांची चित्रपट बनवण्याची आणि अभिनेत्री म्हणून काम करण्याची पद्धत वेगळी असल्याचंही म्हटलं आहे. कंगना याबद्दल नेमकं काय म्हणाल्या हे सविस्तर जाणून घेऊयात…
‘धुरंधर’बद्दल काय म्हणाल्या?
उल्लेख केलेल्या माध्यमाशी संवाद साधताना हॉलीवूडमधील ऑफर्स आणि जागतिक स्तरावर काम करण्याबद्दल कंगना म्हणाल्या, “माझ्याकडे काही ऑफर्स आहेत; परंतु माझ्या वेळ आणि इच्छेनुसार याबद्दल निर्णय घेतला जाईल.” कंगना यांना पुढे ‘धुरंधर’, ‘द कश्मीर फाइल्स’ व ‘इमर्जन्सी’ यांसारख्या संमिश्र प्रतिक्रिया असणाऱ्या चित्रपटांबद्दल विचारल्यानंतर कंगना म्हणाल्या, “कलेचा कुठलाही प्रकार असू द्या, मग ते अगदी पुस्तक असो किंवा चित्रपट; पण कलेचा सामाजिक गोष्टींशी संबंध असायला हवा. त्यामधून ठामपणे याबद्दल चर्चा व्हायला हवी. परंतु, अशा चित्रपटांवर बंदी आणणं, त्यांच्याबद्दल नकारात्मकता पसरवणं हे चुकीचं आहे. टीका करणं आणि बंदी आणणं यामध्ये फरक आहे. मोठे चित्रपट तसेही प्रेक्षकांच्या प्रतिसादामुळेच यशस्वी होतात. त्यामुळे पूर्णपणे काढून टाकणं किंवा तीव्र विरोध करणं अयोग्य आहे. अशा गोष्टींना मी अनेकदा सामोरी गेली आहे आणि याचा मी अनेकदा विरोधही केला आहे. मीसुद्धा कलेकडे कला म्हणूनच पाहते. परंतु, त्यामध्ये ठाम प्रतिक्रिया असणंसुद्धा महत्त्वाचं असतं, जेणेकरून प्रेक्षक जोडले जातात.”
सलमान खानचं केलं कौतुक
सलमान खान, शाहरुख खान व आमिर खान यांच्यापैकी एकाची निवड करायला सांगितल्यानंतर कंगना यांनी सलमान खानला ‘कुल’ म्हटलं आहे. कंगना म्हणाल्या, “हे सगळे माझे मित्र कधी झाले? पण सलमान खान कुल आहे.” पुढे बॉलीवूडमधील जान्हवी कपूर, सारा अली खान व अनन्या पांडे या नवोदित अभिनेत्रींमधून एकीची निवड करायला सांगितल्यानंतर कंगना यांनी हसत अनन्या पांडेचं नाव घेतलं. २०२२ मध्ये कपिल शर्माच्या शोमध्ये कंगना रणौत यांनी अनन्या पांडेची खिल्ली उडवली होती.
करण जोहरबद्दल वक्तव्य
कंगना रणौत यांना पुढे करण जोहर, आदित्य चोप्रा व अनुराग कश्यप यांच्यापैकी उत्कृष्ट दिग्दर्शकाची निवड करायला सांगितल्यानंतर त्या म्हणाल्या, “फिल्ममेकिंग आणि अभिनयाची माझी आवड इतक्या खालच्या दर्जाची नाहीये. किमान मी चांगले चित्रपट बनवले आहेत.” यावेळी त्यांनी कोणत्याही एका दिग्दर्शकाची निवड केली नाही.
