Kangana Ranaut Ruchika Singh PM Modi Controversy: नीट पेपरफुटीनंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉक्रोच जनता पार्टीने दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन केलं होतं. या आंदोलनात देशभरातील तरुण सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करताना अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरले होते. यामध्ये रुचिका सिंह नावाच्या एका मुलीचाही व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. रुचिकाने तिच्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. यानंतर कंगना रणौत यांनीही या मुलीबद्दल एक पोस्ट केली आहे.
रुचिका सिंहने माफी मागितली
रुचिका सिंहचा आंदोलनातील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर तिच्याविरोधात नोएडामधील पोलीस ठाण्यात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यानंतर रुचिकाने माफीचा व्हिडीओ शेअर केला. “मी माझ्या मित्रांबरोबर कनॉट प्लेसला गेले होते. तिथे आंदोलन करणारे काही लोक पंतप्रधान मोदींना खूप शिवीगाळ करत होते आणि ते इतरांनाही यासाठी उद्युक्त करत होते. त्यांच्या प्रभावाखाली येऊन मी ते वक्तव्य केलं, त्याबद्दल मी माफी मागते,” असं रुचिका सिंह म्हणाली.
“मी फक्त १५ वर्षांची आहे. मी जे काही केले ते माफीच्या लायक नाही. मी खूप घाणेरड्या गोष्टी बोलले, पण ही माझी पहिली आणि शेवटची चूक असेल. मी पुन्हा असे कधीही करणार नाही. तसेच हा व्हिडीओ मी पोस्ट केलेला नव्हता. मला खूप लाज वाटतेय. कृपया मला माफ करा,” असं म्हणत रुचिकाने सर्वांची माफी मागितली.
रुचिका सिंहबद्दल कंगना रणौत यांची पोस्ट
“ती फक्त १५ वर्षांची आहे. ती स्वतः सांगतेय की तिच्या आयुष्यात कधीच तिने पंतप्रधान मोदींविरोधात काहीच पोस्ट केलं नाही. पण त्यादिवशी तिच्या मित्रांनी तिला तिथे नेलं आणि तिला मोदींना शिव्या देण्यास उद्युक्त केलं. आपल्याला आपल्या मुलांना अशा फेमिनाझी आणि डाव्या विचारसरणीच्या राक्षसी लोकांपासून वाचवायला हवं. इतक्या सहज आपल्या मुलींचा त्यांच्या अजेंड्यासाठी कसा वापर केला जाऊ शकतो, आपण कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलांना वाचवायला हवं,” असं कंगना रणौत यांनी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिलं.

पंतप्रधान मोदी काय म्हणाले होते?
या आंदोलनात तरुणांनी शिवीगाळ केली होती, त्याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी त्यांच्या व्हिडीओत केला. “जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगाने पाहिलंय. काही खोडकर मुलांनी घाणेरड्या शब्दात शिवीगाळ केली. कोणत्याही सभ्य समाजाला न शोभणार नाहीत, अशा शब्दांचा वापर करण्यात आला. मला तर शिव्या दिल्याच पण माझ्या स्वर्गीय आईला देखील शिवीगाळ करण्यात आली. समाजातील आक्रोश मी समजू शकतो, पण हा एकप्रकारचा सांस्कृतिक धक्का आहे, आमच्या मुली अशाप्रकारची भाषा कशी वापरु शकतात? पण या मुलांना योग्य रस्ता दाखविण्याची हीच वेळ आहे. त्यांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं यामुळे परिस्थिती बदलणार नाही, मला त्यांना माफ करायचंय,” असं मोदी म्हणाले.
