Kangana Ranaut Retro Look : बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत यांनी त्यांच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरू केले आहे. मुंबईमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी कामा रुग्णालयातील थरारक सत्य कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. कंगना रणौत या त्यांच्या अभिनयासह खास स्टायलिंगसाठी ओळखल्या जातात. भारतीय परंपरेची ओळख असलेल्या साडीला स्टायलिश लूक देतात. कंगना यांनी या वेळीही आपल्या हटके साडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांचे संसदेतील साडी लूकदेखील नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, नुकत्याच झालेल्या एका प्रमोशन इव्हेंटसाठी अभिनेत्री कंगना रणौत यांनी खास रेट्रो लूक केला होता.
‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या प्रमोशनवेळी अभिनेत्री कंगना रणौत यांनी रेट्रो स्टाईल पोलका डॉट असलेली साडी परिधान केली होती. पांढऱ्या रंगाच्या या साडीवर फुलांची आकर्षक प्रिंट होती. रंगीत फुले आणि पोल्का डॉट यांच्या फ्युजनमुळे साडी अधिक उठून दिसत होती. ६० च्या दशकातील फॅशनप्रमाणे त्यांनी स्टायलिंग केले होते.
कंगना रणौत यांची विन्टेंज अन् क्लासिक फॅशन
फ्लोरल प्रिंटेड साडीला मॅचिंग स्लीव्हलेस ब्लाऊज आणि त्यासह मोत्यांचे दागिने परिधान केल्याने कंगना यांचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. कंगना रणौत यांच्या विन्टेंज आणि क्लासिक फॅशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शार्प विंग्ड आयलायनर अन् क्लासिक मेकअप
या रेट्रो लूकमध्ये कंगनाने मोत्याचा हेवी नेकलेस स्टाईल केला होता. पाच पदरी मोत्यांच्या हाराला सुंदर असे कुंदनचे पेंडंट होते. त्यासह कानामध्ये कुंदनचे स्टड घालून त्यांनी हा लूक पूर्ण केला होता. जुन्या काळातील बॉलीवूड अभिनेत्रींची आठवण करून देणारा क्लासिक मेकअप आणि लांब, शार्प विंग्ड आयलायनर विशेष लक्ष वेधून घेत होते. अभिनेत्री कंगना रणौतने या रेट्रो साडीसह हाय पोनी टेल हेअरस्टाईल केली होती. काळ्या टिकलीने कंगना रणौत यांनी खास रेट्रो स्टाईल लूक केला होता. अभिनेत्रीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला असून, नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
कंगना यांचा नवीन चित्रपट लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीस
अभिनेत्री कंगना रणौत यांचा ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपट १२ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा चित्रपट २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात कंगना यांनी नर्स ‘अंजली कुलथे’ यांची भूमिका साकारली असून, त्यांचे शौर्य पडद्यावर मांडले आहे. त्यामध्ये कंगना यांच्यासह अभिनेत्री गिरीजा ओक आणि स्मिता तांबे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सध्या कंगना रणौत चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून, विविध खास लूक स्टाईल करीत आहे.
