अभिनेत्री कंगना रनौत सध्या तिच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी महिलांचे आयुष्य, लग्न, करिअर आणि समाजातील त्यांचे योगदान याविषयी मोकळेपणाने भाष्य केले. यावेळी तिची सह-कलाकार मराठी अभिनेत्री स्मिता तांबे हिने कंगनाला लग्नाबद्दल विचारलं. या प्रश्नावर तिने दिलेल्या मजेशीर उत्तराने लक्ष वेधून घेतले.

स्मिता तांबे म्हणाली, “कंगना माझ्या एका प्रश्नाचे उत्तर देत नाहीये की ती लग्न कधी करणार?” यावर कंगना म्हणाली, “आपल्या आयुष्यात काय करत आहे याबद्दल आपण बोलत नव्हतो, तर आपण आपल्या आयुष्यातील सामान्य अनुभवांबद्दल बोलत होतो, पण हो, स्मिता मात्र माझ्या लग्नासाठी स्थळ शोधत आहे.”

लग्न माझी प्राथमिकता नाही – कंगना रणौत

अनेक यशस्वी महिला लग्नाचा निर्णय घेण्यासाठी इतका वेळ का लावतात? असा प्रश्न विचारल्यावर कंगनाने म्हटलं की प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रवास वेगळा असतो. “मला वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्याचा एक प्रवास असतो. माझे सर्व सह-कलाकार विवाहित आहेत, दोघींना तर मुलंही आहेत, परंतु प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो. जसं की गिरिजा खूप कमी वयात आई झाली होती, ही खूप कठीण परिस्थिती असते. प्रत्येक महिलेचा स्वतःचा वेगळा प्रवास असतो. माझ्या बाबतीत सांगायचे तर, माझा लग्न या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे. पण बऱ्याच काळापासून लग्न ही माझी प्राथमिकता राहिलेली नाही. माझं करिअर हीच नेहमी माझी पहिली प्राथमिकता आहे,” असं कंगना रणौत म्हणाल्या.

खरं यश २९ व्या वर्षी मिळालं – कंगना रणौत

“मी सोळा किंवा सतरा वर्षांची असताना काम करायला सुरुवात केली होती, पण मला खरे यश वयाच्या २९ व्या वर्षी मिळाले, मी ‘तनु वेड्स मनु’ आणि ‘क्वीन’ सारखे चित्रपट केले. यानंतर मला आयुष्यात अनेक धाडसी निर्णय घ्यावे लागले. माझे आई-वडील मला म्हणायचे की, ‘हे कसले विचार आहेत? मुली असा विचार करत नाहीत.’ पण मला नेहमी वाटायचं की मला माझ्याच पद्धतीने पुढे जायचंय,” असं कंगना रणौत म्हणाली.

‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट २००८ मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट कामा हॉस्पिटलमध्ये घडलेल्या वास्तविक घटनांवरून प्रेरित आहे. या चित्रपटात कंगना रणौत ‘गीता माधव’ नावाच्या नर्सची भूमिका साकारत आहे.

या चित्रपटात मराठी कलाकारांची मांदियाळी आहे. कंगना रणौतसह गिरिजा ओक, स्मिता तांबे, अमृता नामदेव, ईशा डे, प्रिया बेर्डे, आशा शेलार, सुहिता थट्टे, रसिका अगाशे, आदित्य मिश्रा आणि जाहिद खान यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनोज तापडिया यांनी केले आहे. ‘भारत भाग्य विधाता’ हा चित्रपट १२ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज होणार आहे.