अभिनेत्री व खासदार कंगना रणौत यांनी सोमवारी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी एक सामान्य हिंदू ते अभिमानाने स्वतःला संघी म्हणवून घेण्यापर्यंतचा त्यांचा वैचारिक प्रवास सांगितला. भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि त्यांची संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्याशी जोडल्यामुळे आपल्या विचारांमध्ये बदल झाल्याचंही त्यांनी सांगितलं.
याचवेळी कंगना यांनी एका अभिनेत्रीवर अप्रत्यक्ष टीका केली. नाव न घेता त्यांनी दावा केला की, “एका हिंदू मुलीने मुस्लीम पुरुषाशी लग्न केल्यानंतर तिचे विचार आणि श्रद्धा बदलल्या.” मात्र, कंगना यांनी या अभिनेत्रीचं नाव स्पष्टपणे घेतलेलं नाही. कंगना रणौत म्हणाल्या, “चित्रपटसृष्टीतील अनेक हिंदू मुलींना मी जवळून पाहिलं आणि ओळखते. त्या हिंदू असल्या तरी राजकारणाबाबत त्यांची ठाम भूमिका नसते. त्या साधारणपणे तटस्थ असतात.”
कंगना रणौत काय म्हणाल्या?
त्या पुढे म्हणाल्या, “पण ज्या क्षणी त्या इस्लाम धर्मीय लोकांच्या संपर्कात येतात मग ते लग्नामुळे असो किंवा मैत्रीमुळे त्यांच्या विचारांमध्ये अचानक मोठा बदल होतो. त्या अतिडाव्या विचारसरणीच्या (लेफ्टिस्ट एक्स्ट्रीमिस्ट) बनतात”. कंगना रणौत पुढे म्हणाल्या की, एखाद्या व्यक्तीने आपली विचारसरणी किंवा धर्म बदलण्याबाबत त्यांना कोणतीही अडचण नाही, कारण भारतीय संविधान प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार धर्म आणि विचारसरणी स्वीकारण्याचं स्वातंत्र्य देतं.
कंगना म्हणाल्या, “होय, मी पूर्वी एक सामान्य हिंदू होते. पण आता लोक मला विचारतात, तू कधीपासून संघी झालीस? मला संघी व्हायचं आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्या जागृत हिंदू विचारसरणीचा स्वीकार मला करायचा आहे.” कंगना रणौत पुढे म्हणाल्या, “मी माझी विचारसरणी का बदलू शकत नाही? समाजातील हा दुटप्पीपणा आहे. स्वतःला समाजाचे ठेकेदार समजणारे लोक १० वर्षांपूर्वीचे माझे व्हिडीओ काढून म्हणतात, तू तर खूप पार्टी करायचीस. होय, मी पार्टी करायचे. पण आज मला ठाम विचारांची आणि जागृत हिंदू बनायचं आहे. मग माझ्यासाठी तो मार्ग बंद का असावा?”
त्या पुढे म्हणाल्या, “हा दुटप्पीपणा चालणार नाही. जर आपल्या हिंदू मुलींना ठाम विचारांच्या आणि जागृत हिंदू विचारसरणीचा स्वीकार करायचा असेल, तर त्यात चुकीचं काय आहे?” कंगना रणौत २०२४ मध्ये भारतीय जनता पक्षात (भाजप) सहभागी झाल्या. त्यानंतर त्यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून विजय मिळवला. सध्या त्या लोकसभेच्या खासदार असून, पक्षाच्या विचारसरणी आणि धोरणांचं त्या उघडपणे समर्थन करताना दिसतात.
कंगना यांचा सोनाक्षी सिन्हाला टोला?
दरम्यान, कंगना यांनी व्हिडीओमध्ये मुस्लीम पुरुषाशी लग्न केलेल्या एका ‘हिंदू मुली’चा उल्लेख केल्यानंतर सोशल मीडियावर त्या नेमकं कोणाबद्दल बोलत होत्या, याची चर्चा सुरू झाली. काही नेटकऱ्यांनी ती स्वरा भास्कर यांच्याबद्दल बोलत असल्याचा अंदाज व्यक्त केला. स्वराने २०२३ मध्ये राजकीय कार्यकर्ते फहाद अहमद यांच्याशी लग्न केलं होतं. तर काहींनी कंगना यांचा रोख सोनाक्षी सिन्हाकडे असल्याचं म्हटलं. सोनाक्षीने २०२४ मध्ये झहीर इक्बाल याच्याशी लग्न केलं होतं.
कंगना यांच्या वक्तव्याचा रोख सोनाक्षी सिन्हाकडे असल्याची चर्चा आणखी वाढली. त्याचं कारण म्हणजे सोमवारीच कंगना यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवर केलेली आणखी एक पोस्ट. त्या पोस्टमध्ये त्या म्हणाल्या, “अलीकडे मी एका अभिनेत्रीचं निरीक्षण करत आहे. ती आता खिसेकापूसारखे कपडे घालते आणि तसंच बोलते. हाफ पँट, उलटी कॅप घालून ती आंदोलनकर्त्यांच्या गटारछाप वर्तनाचं जोरदार समर्थन करते.” याआधीही कंगना यांनी जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलनात सहभागी झालेल्या जनरेशन-Zला ‘गटर जनरेशन’ अशी वादग्रस्त उपमा दिली होती. या नव्या पोस्टमधून त्यांनी त्याच भूमिकेची पुनरावृत्ती केली.
कंगना पुढे म्हणाल्या, “एखाद्या नात्यात असताना तुमचा पेहराव तुमच्या मनस्थितीचं प्रतिबिंब असतो, असं मला नेहमी वाटतं. प्रिय सहकलाकार, जर तुला स्वतःला खिसेकापूसारखं वाटत असेल, तर मला वाईट वाटतं. पूर्वी तू अतिशय देखणी दिसायचीस आणि तितक्याच सुसंस्कृतपणे बोलायचीस. तुला नेमकं काय झालं? मतं तुझी असू शकतात, पण तुझ्या स्टाइलमध्ये नक्कीच सुधारणा होऊ शकते. तुला मदत हवी असेल तर मी नेहमी तुझ्यासाठी आहे.”
सोनाक्षीने दिलेला आंदोलकर्त्यांना पाठिंबा
दरम्यान, सोनाक्षी सिन्हाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. हे आंदोलन २० जुलै रोजी नवी दिल्लीतील संसद मोर्चादरम्यान झालं होतं. आंदोलनकर्त्यांनी NEET प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या व्हिडीओंमध्ये सोनाक्षी अनेकदा कॅप आणि शॉर्ट्ससह साध्या, कॅज्युअल पेहरावात दिसली होती.
