भारतीय चित्रपट तसेच दूरचित्रवाणी क्षेत्रातील तंत्रज्ञ, कलाकारांना त्यांच्या सर्वोत्तम कामगिरीसाठी पुरस्कृत करण्यात आलं. त्यानिमित्ताने आयोजित केलेला ‘दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळा २०२३’ नुकताच पार पडला. या कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तर बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कार सोहळ्याची चांगली धामधूम पाहायला मिळाली. यावेळी अभिनेत्री आलिया भट्टला ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि तिच्या सिनेसृष्टीतील योगदानासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. तर दुसरीकडे बॉलिवूड अभिनेता आणि आलियाचा पती रणबीर कपूरला ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील शिवा या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. याबरोबरच वरुण धवनलासुद्धा पुरस्कार मिळाला. याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने नुकतीच नाराजी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा : सोनू निगमला झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी चेंबुरच्या आमदाराचं स्पष्टीकरण; म्हणाले “जे घडलं…”
“नेपोफॅमिली प्रत्येकाचा हक्क हिसकावून घेते” असं म्हणत कंगनाने पुरस्कार मिळालेल्या कलाकारांवर टीका केली आहे. इतकंच नाही तर यावर्षी हे पुरस्कार कोणाला मिळायला हवे होते याची एक यादीसुद्धा कंगनाने शेअर केली आहे. कंगना या पोस्ट मध्ये म्हणते “यंदाचा उत्कृष्ट अभिनेता ‘कांतारा’फेम रिषभ शेट्टी तर उत्कृष्ट अभिनेत्री ‘सीता रामम’मधील मृणाल ठाकूर यांना हा पुरस्कार मिळायला हवा होता. उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून एसएस राजामौली यांना ‘आरआरआर’साठी तर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून ‘द काश्मीर फाइल्स’मधील अनुपम खेर यांना हा पुरस्कार मिळायला हवा होता, तर उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून तब्बूला ‘भूलभुलैया २’साठी पुरस्कार मिळायला हवा होता.”

याबरोबरच कंगनाने आणखी एक पोस्ट करत नेपोटीजम आणि स्टारकिड्सवर निशाण साधला आहे. स्वबळावर पुढे येणाऱ्या कलाकारांवर ही लोक अन्याय करतात असं कंगनाचं म्हणणं आहे. याबरोबरच कंगनाला कशाप्रकारे बाजूला काढण्यात आलं याबद्दलही तिने भाष्य केलं आहे. कंगना गेले काही महीने स्टार सिस्टमबद्दल बेधडकपणे बोलत असते. कंगना सध्या तिच्या आगामी ‘इमर्जन्सि’ या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे.