बॉलिवूड अभिनेता अरशद वारसी त्याची मतं स्पष्टपणे मांडत असतो. बॉलीवूडमधील नेपोटिझम अर्थात घराणेशाहीच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या चर्चेबाबत बोलताना अरशदने मान्य केलं की, स्टारकिड्सना इंडस्ट्रीत प्रवेश मिळवणं तुलनेने सोप असू शकतं. मात्र, यश टिकवून ठेवण्यासाठी अखेरीस गुणवत्ता महत्त्वाची ठरते असं त्याने स्पष्ट केलं. तसंच, स्टारकिड असण्याचा दबाव आपल्या मुलांच्या नजरेतून पाहताना काय जाणवतं याबाबतही अरशदने भाष्य केलं.

यावेळी अरशद वारसीने नेपोटिझमबद्दल बोलताना अभिनेत्री, राजकारणी कंगना रणौत यांच्या नावाचा उल्लेख केला. त्यांनीच हा विषय सुरू केला त्यानंतर इंडस्ट्रीत याबद्दल चर्चा होऊ लागली असं त्याने म्हटलं आहे. यावेळी त्याने सेलिब्रिटींच्या मुलांनाही इंडस्ट्रीत टिकून राहायचं असेल तर मेहनत करावी लागते असं सांगितलं आहे.

कंगनाने नेपोटिझमचा विषय सुरू केला – अरशद वारसी

फिल्मीग्यानला दिलेल्या मुलाखतीत अरशद वारसीला त्याच्या इंडस्ट्रीतील पदार्पणाच्या काळातील नेपोटिझमच्या चर्चेबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्याने सांगितलं की, त्याने करिअरला सुरुवात केली तेव्हा नेपोटिझम हा चर्चेचा विषय नव्हता. तो म्हणाला, “कंगनाने नेपोटिझमचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर तो मोठा झाला. प्रत्येकजण त्याबद्दल बोलू लागला. हो, नेपोटिझम आहे, पण मला त्याचा त्रास होत नाही. माझं मन सांगतं की, शेवटी तुमच्या गुणवत्तेवर सगळं अवलंबून असतं आणि जर तुमच्यात ती असेल तर तुम्ही तिथपर्यंतच पोहोचाल”.

अरशद वारसी पुढे म्हणाला, “मला हेही माहिती आहे की स्टारकिड असणं सोपं नसतं. त्यांच्याकडून खूप अपेक्षा असतात. आज मी माझ्या मुलांबाबतही हेच होताना पाहतो. ती माझी मुलं आहेत म्हणून लोकांना त्यांच्याबद्दल असं वाटतं की त्यांनी चांगला कलाकार असायलाच हवं. मला वाटतं, असं नसलं पाहिजे कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व वेगळं असतं.”

तो पुढे म्हणाला, “स्टारकिड्सकडून खूप जास्त अपेक्षा केल्या जातात आणि त्यांना अनेकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात. हे योग्य नाही. जास्तीत जास्त एवढंच होऊ शकतं की त्यांच्यासाठी एखादा दरवाजा इतरांपेक्षा लवकर उघडेल; पण तुमच्यात टॅलेंट नसेल, तर तो दरवाजा तितक्याच लवकर बंदही होतो.” अरशद वारसीने पुढे सांगितलं की, मुलांना यश मिळेल की अपयश, याची त्याला भीती वाटत नाही. त्याची फक्त आपल्या मुलांनी कलाकार म्हणून चांगलं असाव आणि आपल्या कलेचं सखोल ज्ञान असावं, अशी इच्छा आहे.