Kangana Ranout Spoke About Akshaye Khanna : बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना तीन दशकांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. पण, ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो अनेकांच्या चर्चेचा विषय ठरला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अक्षय एका रात्रीत प्रचंड व्हायरल झाला आणि सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू झाली. फक्त प्रेक्षकच नाही, तर त्यानंतर अनेक कलाकारांनीसुद्धा त्याचं कौतुक केलं.
‘धुरंधर’मुळे अक्षय खन्नाचे आजवरचे अनेक जुने किस्से व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच आता कंगना रणौत हिनं अक्षय खन्नाबद्दल काही वर्षांपूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेची रील व्हायरल होत आहे. कंगनानं ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात अक्षय खन्ना तिच्याकडे बघतही नाही, असं म्हटलेलं. कंगना अक्षय खन्नाबद्दल नेमकं काय म्हणालेली याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात…
कंगणा रणौतने केलेलं अक्षय खन्नाबरोबर फ्लर्ट
२०१० मध्ये दिलेल्या मुलाखती कंगना रणौतबरोबर अनिल कपूर व संजय दत्तसुद्धा उपस्थित होते. करणनं कंगनाला तू अक्षय खन्नाबरोबर फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला आहेस का? असं विचारलं होतं. त्यावर कंगना म्हणालेली, “हो. पण, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.”
कंगनाला करण जोहरनं तिनं यापूर्वी कधी कोणाबरोबर फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केलायस आणि त्या व्यक्तीनं तिला प्रतिसादच नाही दिला, असं झालंय का? असं विचारलं असता, कंगनानं अक्षय खन्नाचं नाव घेतलं. कंगनाचं ते उत्तर ऐकून संजय दत्तच्या चेहऱ्यावरचे हावभाव उडाले आणि अनिल कपूरच्या चेहऱ्यावर मात्र त्याला हे पूर्वीच माहीत होतं, असे हावभाव होते.
कंगनानं अक्षय खन्नाचं नाव घेतल्यानंतर संजय दत्त तर चकित झाला. परंतु, अनिल कपूर म्हणालेला, “हो तिनं मला याबद्दल सांगितलं आहे. ती म्हणालेली की, अरे, तो माझ्याकडे बघतच नाही.” कंगना त्याबद्दल पुढे म्हणाली, “मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. नंतर मी त्याच्याबरोबर फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला; पण तो माझ्याशी काहीच बोलला नाही.”
त्यावर जेव्हा करणनं पण असं का, असा प्रश्न विचारला तेव्हा कंगना म्हणाली, “तो बोलतच नाही. तो कोणाबरोबरच बोलत नाही.” पुढे अनिल कपूर यांच्याकडे बघत ती म्हणाली, “तो तुमच्याशी बोलतो का?” त्यावर अनिल कपूर, “हो. तो माझ्याशी खूप मनमोकळेपणाने बोलतो आणि त्याला माझा लहान भाऊ खूप आवडतो”, असं म्हणाले.

