Kapil Sharma Fitness and Diet Tips: आपल्या विनोदी शैलीने जगभरातील प्रेक्षकांना हसवणारा कपिल शर्मा आता केवळ कॉमेडी पुरता मर्यादित न राहता चित्रपटांमध्येही सक्रिय झाला आहे. पण या चंदेरी दुनियेत टिकण्यासाठी कपिलने स्वतःच्या शरीरयष्टीवर प्रचंड मेहनत घेतली आहे. कपिलचा ‘फॅट टू फिट’ प्रवास थक्क करणारा असून त्याचा फिटनेस ट्रेनर योगेश भतेजा याने कपिलच्या मेहनतीचे गुपित उघड केले आहे. कपिल कधीकाळी पहाटे २ वाजता वर्कआउट करायचा तर कधी वजन कमी करण्यासाठी केवळ सूप आणि सॅलडवर राहायचा. एका पंजाबी व्यक्तीसाठी खाण्यावर नियंत्रण ठेवणं किती कठीण होतं आणि त्याने हे कसं साध्य केलं, याची रंजक माहिती समोर आली आहे.

कपिल शर्माचा ट्रेनर योगेश भतेजाने स्वतः कपिलच्या प्रवासाबद्दल सांगितलंय. कपिल शर्माचे काम असं आहे की त्याला वेळ मिळत नाही, त्यामुळे त्याचा फिटनेसचा प्रवास आव्हानात्मक होता. कपिल मध्यरात्री वर्कआउट करायचा, असं योगेशने सांगितलं. “कपिल एक क्रिएटिव्ह व्यक्ती आहे, त्यामुळे त्याच्या डोक्यात आगामी भागांबद्दल विचार असायचे, तो त्याचं प्लॅनिंग करत असल्याने खूप व्यग्र राहायचा. त्यामुळे आम्ही मध्यरात्री आणि अगदी पहाटे २ वाजताही त्याला ट्रेनिंग दिले. कामामुळे त्याचा स्लिपींग पॅटर्न बिघडला होती. म्हणून आम्ही बेसिक स्ट्रेचिंग आणि ब्रीदिंग प्रॅक्टिसपासून सुरुवात केली होती,” असं योगेश भतेजा म्हणाला.

भरपूर पाणी आणि प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा कपिल शर्मा

कपिलच्या ट्रेनरने सांगितलं की तो २ तास वर्कआउट करायचा. त्यापैकी ४० मिनिटं तो कार्डिओ करायचा आणि मग तो वेट ट्रेनिंग आणि अॅक्वा वर्कआउट करायचा. कपिल कधीकधी रात्री १ तास चालायला जायचा, असंही योगेश भतेजा म्हणाला. ट्रेनरने कपिल शर्माच्या रुटीनबद्दल सांगितलं. कपिल प्रोटीनचे प्रमाण जास्त असलेला आहार घ्यायचा, तसेच तो पाणीदेखील भरपूर प्रमाणात प्यायचा, यामुळे त्याचे वजन कमी होण्यास मदत झाली, असं भतेजा म्हणाला. कपिलच्या शरीरात कोणते व्हिटॅमिन्स व मिनरल कमी आहेत, ते जाणून घ्यासाठी त्याची रक्ताची चाचणी केली होती, असंही भतेजाने नमूद केलं.

Award Banner

योगेश भतेजा म्हणाला की कपिल पंजाबी आहे, त्यामुळे त्याला खायला खूप आवडतं. पण जेव्हा डाएटची गरज असते तेव्हा तो मर्यादित कॅलरीज असलेलं जेवण खातो. जेव्हा कपिलला एखाद्या प्रोजेक्टसाठी वजन कमी करावं लागतं तेव्हा तो फक्त सूप आणि सलाद खातो आणि काही वेळा इंटरमिटेंट फास्टिंग करतो.

कपिल शर्माने ‘२१-२१-२१’ नियमाद्वारे केले फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन

कपिल शर्माने एकदम इंटेन्स वर्कआउट करण्याऐवजी हळुवार सुरुवात केली आणि या ‘२१-२१-२१’ नियमाचे पालन केले.

पहिले २१ दिवस: शरीराची हालचाल

फिट राहण्याच्या या प्रवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात आधी शरीराची हालचाल आणि ‘स्ट्रेचिंग’वर लक्ष केंद्रित केले. योगेशच्या मते, कोणतीही जड व्यायाम न करता आधी सर्व स्नायूंना हळूहळू सक्रिय केले. ज्याप्रमाणे शाळेत कवायत करून घेतली जाते, अगदी तसेच व्यायाम पहिल्या २१ दिवसांत करावेत. या काळात कोणत्याही कडक डाएटची गरज नसते.

पुढील २१ दिवस: आहारातील बदल

सलग २१ दिवस हलके व्यायाम आणि स्ट्रेचिंग केल्यानंतर, पुढच्या २१ दिवसांत हळूहळू खाण्याच्या सवयी बदलायच्या आहेत. मात्र, यासाठी खूप जास्त डाएट करण्याची गरज नाही. आपल्या आहारात थोडे बदल करा. कर्बोदके आणि कॅलरी लगेच कमी करण्याची गरज नाही, फक्त खाण्याच्या पद्धतीत थोडा बदल करणं आवश्यक असतं.

शेवटचे २१ दिवस: वाईट सवयींवर नियंत्रण

योगेशच्या मते, शेवटच्या २१ दिवसांत अशा सवयींवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे ज्यांचे तुम्हाला व्यसन आहे. उदाहरणार्थ- धुम्रपान, मद्यपान किंवा कॅफिनचे (चहा-कॉफी) अतिसेवन. स्वतःवर कोणताही दबाव न टाकता हळूहळू या सवयींमध्ये बदल घडवून आणायचा आहे.

यानंतर प्रत्यक्ष जिममध्ये सराव सुरू करायचा आहे. या नियमाचे पालन केल्यावर ४२ दिवसांनंतरच शरीरात बदल दिसू लागतात आणि तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी प्रेरणा मिळते.