अभिनेते धर्मेंद्र यांना १२ दिवसांच्या उपचारानंतर बुधवारी सकाळी ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्जार्च देण्यात आला. यादरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. ज्यामुळे देओल कुटुंबीयांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला. ईशा देओल, हेमा मालिनी या दोघींनी सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांबाबत पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. सध्या धर्मेंद्र यांच्या घरातील आणखी एक पर्सनल व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यानंतर मात्र, अभिनेता सनी देओलने बंगल्याबाहेर उभ्या असलेल्या पापाराझींना चांगलंच सुनावलं.
“तुमच्या घरी आई-वडील आहेत, मुलं आहेत…तुम्हाला लाज नाहीये का?” असा संतप्त सवाल सनी देओलने पापाराझींना केला. आता यानंतर दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने देखील पापाराझींना सुनावलं आहे. करणने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. हे मीडिया कव्हरेज नसून हा अपमान आहे, त्या कुटुंबाला त्यांचा वेळ घेऊ द्या…प्लीज त्यांना एकटं सोडा असं त्याने म्हटलं आहे.
“जेव्हा आपल्या हृदयात कोणत्याही संवेदना, सौजन्य उरत नाही तेव्हा आपण माणूस म्हणून संपलेलो असतो. प्लीज, माणुसकीच्या नात्याने का होईना त्या कुटुंबाला एकटं सोडा, त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्या. आधीच भावनिकदृष्ट्या ते खूप काही सहन करत आहेत. हा काळ त्या सगळ्यांसाठी खूपच कठीण आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत मोठं योगदान देणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याच्या ( धर्मेंद्र ) बाबतीत मीडिया व पापराझी जे काही करत आहेत ते अतिशय चुकीचं आहे. हे मीडिया कव्हरेज नाहीये…हा अपमान आहे!” अशी पोस्ट करण जोहरने शेअर केली आहे.
दरम्यान, धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास जाणवल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना १२ दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज दिल्यावर डॉ. प्रतित समदानी यांनी पीटीआयशी संवाद साधताना धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची बातमी दिली. डॉक्टर म्हणाले, “धर्मेंद्र यांना सकाळी ७:३० वाजता डिस्चार्ज देण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी घेतलेल्या निर्णयानुसार इथून पुढे राहत्या घरी धर्मेंद्रजी यांच्यावर उपचार केले जातील.”
