Akshaye Khanna : ‘धुरंधर’ चित्रपटामुळे सध्या सर्वत्र अक्षय खन्नाची क्रेझ निर्माण झाली आहे. चित्रपटात त्याने साकारलेली जबरदस्त भूमिका, अक्षय खन्नाचे संवाद, फासला गाण्यावरील त्याचा डान्स याचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात येत आहे. २०२५ हे वर्ष अक्षय खन्नासाठी खूपच खास ठरलं. कारण, यंदा प्रदर्शित झालेल्या ‘छावा’ आणि ‘धुरंधर’ या दोन्ही सिनेमांमध्ये त्याने साकारलेल्या नकारात्मक भूमिकांना प्रेक्षकांकडून कौतुकाची थाप मिळाली. पण, तुम्हाला माहितीये का इंटरनेटवर सध्या ट्रेंडिंग असणाऱ्या अक्षय खन्नाची आवडती अभिनेत्री कोण आहे? याबद्दल त्याने जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता.

अक्षय खन्नाने सोनाक्षी सिन्हा व सिद्धार्थ मल्होत्रासह करण जोहरच्या एका मुलाखतीला उपस्थिती लावली होती. यावेळी करण जोहरने त्याला बॉलीवूडमधील सर्वात सेक्सी अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारला. यावर अक्षयने काय उत्तर दिलंय पाहुयात…

करणच्या प्रश्नावर थोडा विचार करून अक्षय खन्ना म्हणाला, “ऐश्वर्या राय…मी जेव्हा-जेव्हा तिला भेटतो तिच्याकडे बघत राहतो. तिच्यावरून सहज कोणालाही नजर हटवता येणार नाही. खरंतर तिला या सगळ्याची आता सवय झाली आहे. पण, एका पॉईंटला आपल्यालाच लाज वाटते अरे आपण किती वेळ बघतोय…ती सुंदर आहेच पण याचबरोबर ती मनाने सुद्धा तेवढीच सुंदर आहे. ‘ताल’ चित्रपटात आम्ही एकत्र काम केलं होतं…खरंच ती खूप छान काम करते.”

यावर तिथे उपस्थित असलेली सोनाक्षी सिन्हा म्हणते, “फक्त तुम्ही पुरुषच नाहीतर…मी सुद्धा तिला भेटल्यावर तिच्यावरून नजर हटवू शकत नाही. ती खूपच सुंदर आहे.”

अक्षय खन्ना व ऐश्वर्या राय या दोघांनी ‘ताल’, ‘आ अब लौट चलें’ या चित्रपटांमध्ये एकत्र स्क्रीन शेअर केली होती. यापैकी ‘ताल’ सिनेमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. विशेष म्हणजे ‘ताल’मधील सगळी गाणी आजही सोशल मीडियावर ट्रेंडिंग असतात.

दरम्यान, आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. याशिवाय चित्रपटातील अक्षय खन्नाचे रील्स व्हिडीओ इंटरनेटवर सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. आता २०२६ मध्ये अक्षय खन्ना ‘दृश्यम ३’ सिनेमात झळकणार आहे. तसेच ‘धुरंधर’च्या दुसऱ्या भागातही प्रेक्षकांना त्याची झलक पाहायला मिळेल.