करण जोहर व कार्तिक आर्यन यांच्यामध्ये २०२१ मध्ये वाद झाला होता. हा वाद करण जोहरच्या ‘दोस्ताना २’ या चित्रपटावरून झाला होता. ‘दोस्ताना २’साठी आधी कार्तिक आर्यनची निवड झाली होती, परंतु नंतर करण जोहरबरोबरच्या वैचारिक मतभेदामुळे अभिनेत्याने हा चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी या दोघांमधील मतभेदांवर अनेकदा बोललं गेलं. पण, २०२४ रोजी या दोघांनी त्यांच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली होती.

२५ डिसेंबर २०२४ ला ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या चित्रपटाची घोषणा केली. मराठमोळे दिग्दर्शक समीर विद्वंस या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहे. यामध्ये अभिनेता कार्तिक आर्यन व अभिनेत्री अनन्या पांडे मुख्य भूमिका साकारत आहेत. करण जोहरने नुकतीच ‘बॉलीवूड हंगामा’ला मुलाखत दिली आहे, यामध्ये त्याने कार्तिकबरोबर झालेल्या वादाबद्दल सांगितलं आहे. तो म्हणाला, “आम्ही आपआपसात यावर चर्चा केली आणि तो वाद मिटवला.” पुढे करण म्हणाला, “जे होऊन गेलं आहे त्याला विसरण्यातच भलं आहे.”

कार्तिक आर्यनबद्दल करण म्हणाला, “तो एक खूप मेहनती आणि प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. आम्ही भेटलो, एकमेकांशी बोललो आणि एकत्र काम करण्याचा निर्णय घेतला. सगळं नीट आणि सुरळीत पार पडलं”. पुढे करण म्हणाला, “प्रत्येकाचे वाद असतात, पण मी या इंडस्ट्रीला एक कुटुंब समजतो, त्यामुळे कुटुंबीयांमध्ये असे काही वाद होत असतात. पण, कितीही वाद असले तरी चांगल्या माणसांना नेहमी चांगले चित्रपटच बनवायचे असतात, त्यामुळे चांगली कलाकृती घडवण्यासाठी ते एकत्र येतात.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कार्तिक व करण जोहर त्यांच्या ‘तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी’ या आगामी चित्रपटासाठी एकत्र आले असून या चित्रपटाचं चित्रीकरण नुकतच सुरू झालं आहे. या चित्रपटासह कार्तिक मुख्य भूमिकेत असलेल्या ‘नागझिला’ या चित्रपटाची निर्मितीही करण जोहर करत आहे. या दोन चित्रपटांव्यतिरिक्त कार्तिक आर्यन अनुराग बासू यांच्या आगामी चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलिलासह मुख्य भूमिकेत झळकणार आहे.