Chetak Screen Awards 2026 : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘चेतक स्क्रीन अवॉर्ड’ सोहळ्यामध्ये बॉलीवूडमधील कलाकारांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यामध्ये करण जोहरच्या ‘होमबाउंड’ चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. करण जोहरने या चित्रपटाची निर्मिती केली असून प्रतिष्ठित स्क्रीन अवॉर्ड मिळाल्याने त्याने आनंद व्यक्त केला आहे. करणने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला. “होमबाउंडला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल मला प्रचंड अभिमान आणि आनंद असल्याचे करण जोहरने म्हटले आहे.

करण जोहरने इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज घायवान यांचे विशेष कौतुक केले. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने लिहिले की, “या खास चित्रपटाशी जोडलेल्या सर्व कलाकार आणि तांत्रिक टीमचे हार्दिक अभिनंदन आणि नीरज घायवानच्या कामाचे खास कौतुक,” असे करणने नमूद केले. ‘

करण जोहरने व्यक्त केल्या भावना

‘होमबाउंड’ या चित्रपटाबद्दल करण जोहरने यापूर्वीदेखील अनेकदा भावना व्यक्त केल्या आहेत. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये चित्रपटाला तब्बल नऊ मिनिटांचे स्टँडिंग ओव्हेशन मिळाल्यानंतर त्याने सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला होता. तसेच चित्रपट ऑस्करच्या शॉर्टलिस्टमध्ये पोहोचल्यावर आणि अंतिम नामांकन मिळाले नाही, तरीही त्याने सोशल मीडियावर ‘होमबाउंड चित्रपटाबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत.

‘होमबाउंड’ने पटकवले तीन पुरस्कार

मुंबईमध्ये ५ एप्रिल रोजी पार पडलेल्या चेतक स्क्रीन अवॉर्ड्स सोहळ्याचे थेट प्रक्षेपण सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर करण्यात आले. ‘होमबाउंड’ चित्रपटाने या सोहळ्यात एकूण तीन पुरस्कार पटकावले. आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटाने तब्बल १४ पुरस्कार जिंकत सर्वांचे लक्ष वेधले.

५३ सदस्यांची ‘स्क्रीन अकॅडमी’

‘चेतक स्क्रीन अवॉर्ड्स’ हे ‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’ तर्फे आयोजित केले जातात. बॉक्स ऑफिसची कमाई किंवा स्टारडमपेक्षा उत्कृष्ट कलाकृतीला प्राधान्य देणे, ही या पुरस्कारांची खासियत मानली जाते. २०२६ मधील विजेत्यांची निवड ५३ सदस्यांच्या स्वतंत्र ‘स्क्रीन अकॅडमी’ने केली. यामध्ये राजकुमार हिरानी, ​​विद्या बालन, शूजित सरकार, दीपा मेहता, कबीर खान, गुनीत मोंगा कपूर यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता.

भारताकडून ऑस्कर २०२६ साठी अधिकृत प्रवेश

‘होमबाउंड’ हा नीरज घायवान दिग्दर्शित एक अत्यंत प्रभावी आणि वास्तववादी हिंदी चित्रपट आहे. याची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन्सने केली आहे. नातेसंबंध, संघर्ष, स्वप्ने आणि आयुष्यातील घटनांवर चित्रपटाचे कथानक प्रभावीपणे मांडण्यात आले आहे . एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट भारताकडून ऑस्कर २०२६ साठी अधिकृत प्रवेश म्हणून निवडला गेला होता.