Karan Johar Weight Loss Secret: करण जोहर त्याच्या बॉलीवूडच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतो. तो दिग्दर्शक असण्याबरोबरच चित्रपट निर्मातादेखील आहे. त्याच्या अनेक वक्तव्याची मोठी चर्चा होताना दिसते.
गेल्या काही दिवसांपासून करण जोहर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. त्याचे अचानक घटलेले वजन हा चर्चेचा विषय ठरल्याचे पाहायला मिळाले. अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले, तर काहींनी ओझेम्पिक हे औषध घेऊन त्याने वजन कमी केल्याचे म्हटले.
करण जोहरने कसे वजन कमी केले?
आता करण जोहरने नुकत्याच एका मुलाखतीत त्याने कोणतेही औषध घेऊन वजन कमी केले नाही, असे स्पष्ट केले आहे. करण जोहरने राज शम्मींच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्याला विचारले की, त्याने ओझेम्पिक हे औषध घेऊन वजन कमी केले आहे का? यावर करण जोहर म्हणाला, “मी नेहमीच लठ्ठपणाच्या समस्येचा सामना केला आहे. मी वेगवेगळ्या प्रकारचे डाएट केले आहे. जवळजवळ ५०० प्रकारचा व्यायाम केला आहे. पण, काही कारणांमुळे माझे वजन कधीच कमी झाले नाही.
करण जोहर म्हणाला की, माझ्या लक्षात आले की मला थाइरॉइडची समस्या आहे, त्याचा माझ्या वजनावर परिणाम होत होता. लोक म्हणतात की मी ओझेम्पिक औषध घेऊन वजन कमी केले आहे. मला आता त्याचा कंटाळा आला आहे. माझे लोकांना सत्य माहीत नाही आणि माझे सत्य इतरांना सांगण्यासाठी मी उत्सुक नाही.
वजन कमी केल्यानंतर आत्मविश्वास वाटू लागल्याचे करण जोहरने वक्तव्य केले. करण जोहर म्हणाले, “मला माझ्या शरीराबद्दल याआधी कधीही आत्मविश्वास वाटला नव्हता. वजन कमी केल्याने मला आनंद वाटतो. ५२ वर्षांनंतर मला आत्मविश्वास वाटत आहे.”
पुढे करण जोहरने म्हटले की, मी माझ्या आयुष्याबद्दल काहीही लपवत नाही. जर मी औषध खाऊन वजन कमी केले असते तर त्याबद्दल उघडपणे बोललो असतो; तर त्याबद्दल मी इतरांनादेखील सल्ला दिला असता. करण जोहर गमतीत म्हणाला की, ओझेम्पिकचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून माझी निवड केली जाऊ शकते. यातून मला पैसे कमवण्याचा मार्ग मिळेल.
वजन कमी कसे केले? यावर करण जोहर म्हणाला, “दिवसातून एकदा जेवण करणे, ही गोष्ट मी केली. OMAD(One meal a day) हा फॉर्म्युला वापरला. पहिले सात दिवस अत्यंत कठीण होते. सात महिने मी दिवसातून एकदाच जेवण करत होतो. मी दररोज रात्री ८.३० वाजता जेवण करायचो. त्यामध्ये लॅक्टोज, ग्लुकोज, ग्लुटेन यांचे प्रमाण नव्हते, हे मी न थकता केले. मी माझी दिनचर्चा पाळली. अलीकडे मी लॅक्टोजचे सेवन पुन्हा सुरू केले आहे, कारण मला थोडे वजन वाढविण्याची गरज आहे”, असे म्हणत करण जोहरने त्याचे वजन कमी कसे केले, याबद्दल वक्तव्य केले आहे.