Karan Johar on Ramayana Movie: नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण: पार्ट १’ हा बहुप्रतीक्षित सिनेमा आज (५ नोव्हेंबर २०२६)ला प्रदर्शित झाला आहे. आता सिनेमा पाहिल्यानंतर अनेक जण त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. या सगळ्यात लोकप्रिय दिग्दर्शक आणि निर्मात करण जोहरने सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. करण जोहर सिनेमाबद्दल नेमकं काय म्हणाला आहे, याबद्दल जाणून घेऊ…
“आपल्या संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेली गोष्ट म्हणजे…”
करण जोहरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ‘रामायण’ सिनेमाचे पोस्टर शेअर करत सिनेमा, निर्माते, दिग्दर्शक आणि सिनेमात काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे कौतुक केले. करण जोहरने लिहिले, “आपल्या संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेली गोष्ट म्हणजे रामायण आहे. पिढ्यानपिढ्या ही गोष्ट ऐकत मोठ्या झाल्या आहेत. रामायण ही मूल्यं, परंपरा आणि माणुसकी यांचं प्रतीक आहे.”
पुढे त्याने लिहिले, “तुम्ही ही गोष्ट वाचली आहे, पाहिली आहे, इतरांना सांगितलीही आहे. पण, तरीही तिचं सिनेमॅटिक रूप पाहून थक्क व्हायला होतं. हे खरंच चमत्कारापेक्षा कमी नाही. ‘रामायण’च्या संपूर्ण टीममधील प्रत्येकाला माझा सलाम आहे. मला त्यांचं कौतुक वाटतं आणि त्यांच्याप्रति माझ्या मनात आदर आहे. आपण सगळेच असं स्वप्न पाहू शकतो. पण, या टीमने ते प्रत्यक्षात आणलं आहे.”
‘रामायण’ सिनेमाचे निर्माते नमित मल्होत्रा यांना टॅग करत त्याने लिहिले, “तुम्ही मला धाडसी होण्यासाठी, मोठी स्वप्नं पाहण्यासाठी आणि एखाद्या क्रिएटरसाठी सर्वांत महत्त्वाच्या असलेल्या गोष्टीसाठी म्हणजेच स्वतःच्या विचारांवर ठाम विश्वास ठेवण्यासाठी प्रेरित केलं आहे.”
सिनेमाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांना टॅग करत करण जोहरने लिहिले, “सर तुमच्याबद्दल खूप आदर आणि प्रेम आहे. एखादी साधी गोष्ट इतक्या साधेपणाने, तरीही ठामपणे, आत्मविश्वासाने सांगण्याच्या कौशल्याला माझा सलाम आहे.”
“प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील तुझा अभिनय…”
रणबीरबद्दल करणने लिहिले, “कोणताही दिखावा किंवा इतर काही न करता संपूर्ण देशाला तुझ्यामध्ये दैवी शक्ती आणि माणुसकीचं प्रतीक असल्याचा विश्वास वाटायला लावणं हे मोठं टॅलेंट आहे. तू एक प्रतिभावान कलाकार आहेस. प्रभू श्रीरामांच्या भूमिकेतील तुझा अभिनय मनाला भावणारा आहे. तुझे डोळेच खूप काही सांगून जातात. ही तुझ्या कारकिर्दीतील सर्वांत आव्हानात्मक भूमिका आहे आणि तू ती दैवी परिपूर्णतेने साकारली आहेस.”
साई पल्लवीबद्दल करण जोहरने लिहिले, “सीतेच्या भूमिकेतील तुझा अभिनय दैवी, अप्रतिम आणि मनाला भावणारा आहे. तुझ्या अभिनयातील समर्पणाची भावना खूप भावते. तुझ्या त्यागाच्या आणि निःस्वार्थ प्रेमाच्या सामर्थ्यावर तू तुझ्या अभिनयाने विश्वास ठेवायला भाग पाडले आहेस.”
रावणाची भूमिका साकारणाऱ्या यशबद्दल लिहिले, “तू खरंच मंत्रमुग्ध केले आहेस. तुझा अभिनय प्रभावशाली आहे. ज्या ज्या वेळी तू स्क्रीनवर दिसतोस, त्या प्रत्येक वेळी लक्ष वेधून घेतोस. स्टारडम जणू तुझ्या डीएनएमध्येच आहे. रावणाच्या अनेक अंतर्मनातील आवाजांचे सीक्वेन्स विशेष भावले, त्याचा विशेष उल्लेख करावासा वाटतो.”
रवी दुबेचेही करणने कौतुक केले. त्याने लिहिले, “लक्ष्मणाच्या भूमिकेत तू अतिशय अप्रतिम काम केले आहेस. निष्ठावान आणि प्रेमळ भाऊ खूप भावतो.”
शेवटी त्याने ‘रामायण’ सिनेमातील प्रत्येक कलाकाराचे कौतुक केले. त्याने लिहिले की, या चित्रपटातील प्रत्येक कलाकाराचं, प्रत्येक तंत्रज्ञाचं आणि या महाकाव्याच्या निर्मितीत सहभागी असलेल्या प्रत्येक सदस्याचं मनापासून अभिनंदन. तसेच, हा सिनेमा सर्वांनी त्यांच्या कुटुंबीयांबरोबर पाहावा, असे त्याने प्रेक्षकांना आवाहनही केले.
करण जोहरच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट्स करत प्रेम व्यक्त केले आहे. आदिनाथ कोठारेने हार्ट इमोजी शेअर केल्याचे दिसत आहे. करणबरोबरच, सिनेसृष्टीतील इतर कलाकारांना हा सिनेमा आवडणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
