Karan Johar Praises Dhurandhar 2 : सध्या सर्वत्र एकाच चित्रपटाची जोरदार चर्चा आहे, तो चित्रपट म्हणजे ‘धुरंधर २’. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंहची मुख्य भूमिका आहे. १९ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या चित्रपटाचं सध्या सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. अशातच बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनेसुद्धा ‘धुरंधर २’साठी कौतुकास्पद पोस्ट शेअर केली आहे.
करण जोहरने ‘धुरंधर २’चे पोस्टर शेअर करत एक मोठी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमधून त्याने रणवीर सिंहसह आदित्य धर आणि चित्रपटाच्या सर्वच तंत्रज्ञांचे कौतुक केले आहे. करण जोहर नेमकं काय म्हणालाय? चला जाणून घेऊ…
करण जोहरने आदित्य धरचे केले कौतुक
करण म्हणतो, “टेस्टोस्टेरॉन, ‘हायपर अल्फा’ एनर्जी आणि प्रखर देशभक्तीबद्दलच्या चर्चा तर होतच राहतील, पण ‘धुरंधर २’ चित्रपट केवळ तेवढ्यापुरता मर्यादित नाही. जसकीरतची हृदयस्पर्शी कथा, देशासाठी केलेले बलिदान आणि खलनायकाच्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू अत्यंत उत्कृष्टपणे पडद्यावर उतरवले आहेत. चित्रपटाचे संगीत आणि तांत्रिक बाजू आदित्य धरची दिग्दर्शनावरील पकड सिद्ध करते. आदित्य धरने केवळ मुख्य प्रवाहातील सिनेमाचा दर्जाच उंचावला नाही, तर एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. हा असा दिग्दर्शक आहे, जो बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड्स मोडून एक नवा इतिहास रचेल.”
रणवीर तू खऱ्या अर्थाने एक ‘धुरंधर’ आहेस
रणवीर सिंहचं कौतुक करत करण म्हणतो, “रणवीर, तू खरंच कमाल आहेस! हे तुझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम आहे. तुझे डोळ्यांतील अश्रू आणि तुझी शांत नजर… हे सर्वच तू एक महान कलाकार असल्याचे सिद्ध करते. तू खऱ्या अर्थाने एक ‘धुरंधर’ आहेस.” यापुढे तो म्हणाला, “हा चित्रपट पाहताना मला ७० च्या दशकातील सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये पाहिलेल्या अस्सल हिंदी सिनेमांची आठवण झाली. तेव्हा ते सिनेमे पाहून मी या इंडस्ट्रीचा भाग होण्याची स्वप्ने पाहायचो आणि आज या इंडस्ट्रीचा एक भाग असल्याचा मला अभिमान वाटतोय. ‘धुरंधर’ने मला याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली.”
करणने कौतुक करताच आदित्य धर म्हणाला…
करणच्या या कौतुकास्पद पोस्टवर दिग्दर्शक आदित्य धरनेसुद्धा कमेंट करत त्याचे आभार मानले आहेत. “करण, तुझे हे शब्द माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत. ‘धुरंधर’ हा चित्रपट अतिशय प्रामाणिक भावनेतून तयार झाला आहे. गोंगाटामागचं शांत वास्तव आणि धैर्यामागची खरी किंमत दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. तुला हा चित्रपट मनापासून भावला, यासाठी मी मनापासून आभारी आहे”, असं त्याने म्हटलं आहे.
दरम्यान, करण जोहर व्यतिरिक्त कंगना रणौत, रजनीकांत, ज्युनियर एनटीआर, अल्लू अर्जुन, महेश बाबू, एस.एस. राजामौली आणि नागार्जुन यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही याआधी चित्रपटाचे कौतुक केले आहे.
