Karan Johar Threat Call : ९० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी आणि मुंबईतील अंडरवर्ल्ड यांचे संबंध सर्वश्रुत आहेत.. त्या काळात अनेक निर्माते आणि कलाकारांना खंडणीसाठी धमकीचे फोन येत असल्याच्या घटना समोर आल्या. त्याच काळात निर्माता गुलशन कुमार आणि मुकेश दुग्गल यांची अंडरवर्ल्ड गँगस्टर्सनी गोळ्या झाडून हत्या केली होती.
अलीकडेच दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने एका पॉडकास्टमध्ये त्या काळातील अनुभव सांगितले. रणवीर अलाहाबादियाशी बोलताना तिने ९० च्या दशकात बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्डचा प्रभाव कसा वाढत होता, याबद्दल आठवणी शेअर केल्या.
जेव्हा मुकेश दुग्गल यांची हत्या झाली…
फराह खानने रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये एक आठवण सांगितली. ती म्हणाली, “मी माझ्या करिअरची नुकतीच सुरुवात केली होती, तेव्हा निर्माता मुकेश दुग्गल यांची हत्या झाली. आम्ही एका चित्रपटाच्या सेटवर होतो आणि ही बातमी ऐकून सगळे हादरले होते.” यानंतर जेव्हा फराहला विचारण्यात आले की, शाहरुख खान, सलमान खान आणि आमीर खान यांच्यावरही अंडरवर्ल्डचा दबाव होता का? त्यावर तिने स्पष्टपणे “हो” असे उत्तर दिले. शाहरुख खानला धमकीचे फोन आले होते का, असा प्रश्न विचारल्यावर फराहने तिला त्या विशिष्ट घटनेबद्दल माहिती नसल्याचं म्हटलं
करण जोहरला जीवे मारण्याची धमकी
फराहने सांगितले की, करण जोहरच्या पहिल्याच चित्रपटाच्या वेळी (कुछ कुछ होता है) वातावरण अतिशय भीतीदायक होते. ती म्हणाली, “करणला अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या होत्या. प्रीमियर रद्द करायचा की नाही, यावर चर्चा सुरू होती. सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. करण खूप तणावात होता. आपला पहिला चित्रपट प्रदर्शित होत असताना आनंद साजरा करण्याऐवजी तो स्वत:च्या मृत्यूच्या विचाराने काळजीत होता.”
करण जोहरनेही सांगितलेला ‘तो’ प्रसंग
करण जोहरने त्याच्या ‘अनसुटेबल बॉय’ या आत्मचरित्रात या प्रसंगाचे सविस्तर वर्णन केले आहे. डॉन अबू सालेमने करणच्या घरी फोन करून धमकी दिली होती. त्या प्रसंगाची आठवण सांगताना त्याने लिहिले, “फोन वाजला आणि माझ्या आईने तो उचलला. तो अंडरवर्ल्डकडून आलेला फोन होता. समोरच्या व्यक्तीने आईला सांगितले, ‘तुमचा मुलगा लाल टी-शर्ट घालून उभा आहे, आम्ही त्याला पाहत आहोत. जर हा चित्रपट रिलीज केला तर आम्ही त्याला गोळी मारू’.”
शाहरुख खानने करणला दिलेला धीर
करण जोहरने सांगितले की, या धमकीनंतर शाहरुख खानने त्याला धीर दिला होता. शाहरुख खानने दाखवलेली हिंमत वाखाणण्याजोगी होती. करणने लिहिलंय की, “शाहरुख मला म्हणाला, काय मूर्खपणा आहे! त्याने मला बाहेर नेलं आणि म्हणाला, ‘मी तुझ्या समोर उभा आहे, बघू कोणाची हिंमत आहे तुला गोळ्या घालायची. मी पठाण आहे, मला काही होणार नाही आणि मी तुझ्यासारख्या माझ्या भावालाही काही होऊ देणार नाही.'”
शाहरुखलाही आलेले धमकीचे फोन
King of Bollywood : Shah Rukh Khan and the Seductive World of Indian Cinema या अनुपमा चोप्रा यांच्या पुस्तकातही शाहरुख खानने अंडरवर्ल्डकडून आलेल्या धमकीच्या फोनबद्दल सांगितले आहे. “मी जणू एखाद्या दुर्बिणीखाली जगत आहे असे वाटायचे. तो काळ खूप भीतीदायक आणि त्रासदायक होता”, असं यात शाहरुख म्हणाला आहे.
