Karan Johar Talks About Late Saroj Khan : करण जोहर बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माता आहे. त्यानं आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. करणने आदित्य चोप्रांकडे ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटासाठी असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केलेली. अशातच आता करण जोहरनं त्याच्या इंडस्ट्रीतील संघर्षाबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यानं त्याला खूप त्रास झाल्याचं म्हटलं आहे.
‘हॉलीवूड रिपोर्टर इंडिया’शी संवाद साधताना करण जोहरनं शाहरुख खान व काजोल यांच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या चित्रपटासाठी तो सहायक वेशभूषाकार म्हणून काम करतानाचा एक किस्सा सांगितला आहे. चित्रपटातील ‘मेहंदी लगाके रखना’ या गाण्यादरम्यानचा एक किस्सा करणनं सांगितलाय. या चित्रपटासाठी मनीष मल्होत्रा आणि आदित्य चोप्रा यांच्या आई पामेला चोप्रा हे दोघे कॉस्च्युम डिझायनिगचं सगळं काम पाहत होते. करणला फक्त त्याचं नियोजन करून सेटवर आणण्याचं काम करायचं होतं.
करण जोहरने सांगितला असिस्टंट म्हणून काम करण्याचा अनुभव
करण म्हणाला, “त्यावेळी कॉस्च्युमदादा माझा सगळ्यात मोठा आधार होता. मनीष सकाळी यायचा आणि सर्व कपडे माझ्याकडे देऊन जायचा. मी असिस्टंट होतो आणि पामेला काकीसुद्धा त्यामध्ये बारीक लक्ष द्यायच्या. मी त्यांना मदत करायचो. त्यांना सर्व गोष्टी नीट लागायच्या.” करणनं पुढे, शावा स्टेप्ससाठी ऐन वेळी लाल रंगाचे कापड लागणार असल्याने गोंधळ झाला होता, असं सांगितलं आहे.
सरोज खान यांच्याबद्दल काय म्हणाला करण जोहर?
करण त्याबद्दल पुढे म्हणाला, “आमच्याकडे पुरेसेकपडे नव्हते. लाल रंगाचे कपडे होते; पण ते खूप कमी होते आणि डान्सरची संख्या जास्त असल्यानं प्रत्येकी फक्त एकच लाल रंगाचं कापड देऊ शकलो. त्यामधून मार्ग काढण्यासाठी मी सरोजजींची असिस्टंट जोजोकडे गेलो. त्यांनी जर डान्सर्सनी एका हातात ते कापड धरलं आणि दुसरा हात खिशात ठेवला, तर ते खूप स्टायलिश वाटेल, असं सुचवलं.” परंतु, सरोजजींना ही कल्पना फारशी पटली नाही आणि त्या करण जोहरवर खूप रागावल्या.
करण त्याबद्दल म्हणाला, “त्यांनी मला अक्षरश: धक्का दिला आणि म्हणाल्या की, तुला हवं तिथे कुठेही जा. गोरेगावला जा आणि ते लाल रंगाचं कापड घेऊन ये. नाही तर मी शूट करणार नाही. मला आठवतंय की, मी कॉस्च्युमदादाबरोबर गोरेगावच्या गल्लीत फिरत होतो आणि ते लाल रंगाचं सॅटिनचं कापड शोधत होतो. मला तेव्हा खूप जास्त भीती वाटलेली. मला त्रास झालेला. मी घाबरत होतो.”
सरोजजींबद्दल करण पुढे म्हणाला, “मी त्यांना खूप घाबरायचो; पण त्या खूप चांगल्या होत्या. त्यांना मी अजिबात आवडायचो नाही. त्यांना माझ्याबरोबर काम करताना आनंद झाला नाही.” करण जोहरनं पुढे ‘तुझे देखा है तो जाना सनम’ या गाण्याचाही एक किस्सा सांगितला आहे. तो म्हणाला, “एक मॉन्टेज सीन सुरू होता, ज्यासाठी मी शाहरुख व काजोलला दोघांना डंगरी दिली होती. सरोजजी त्यांच्याकडे पाहून म्हणाल्या की, हे लोक बेबी बनून का आलेत? मी उत्तर दिल्यानंतर त्यांना राग आला. जणू हा मुलगा सारखा का बोलत असतो. त्यावेळी आदित्य माझ्याकडे बघून मला डोळ्यांनी इशारा करायचा की, तू का तुझं तोंड उघडतोयस. त्यावेळी मला खरंच फार काही माहीत नव्हतं.”

