Saba Pataudi on Kareena Kapoor: कलाकार रोजच्या आयुष्यात त्यांच्या आजूबाजूच्या लोकांबरोबर, नातेवाइकांबरोबर कसे वागत असतील याबद्दल अनेकांना उत्सुकता असते. आता सैफ अली खानची बहीण सबा पतौडीने भावाबद्दल तसेच करीनाबद्दल वक्तव्य केले आहे.
“तो माझ्या कपाटातले कपडे घेऊन…”
सबा पतौडीने नुकतीच Big Bollywood Buffs ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत ती सैफबद्दल म्हणाली, “आम्ही दोघांनी लहानपणापासून बराच वेळ एकत्र घालवला आहे. एकदा तर त्याने माझ्या बहिणीच्या टी-शर्टऐवजी माझा टी-शर्ट चोरून नेला होता. तो माझ्या कपाटातले कपडे घेऊन घालायचा. मी आईला विचारायचे की, माझा आवडता निळा शर्ट कुठेच सापडत नाहीये. त्यावर आई म्हणायची की आता कळलं, सैफ हा एवढा घट्ट निळा टी-शर्ट घालून सगळीकडे का फिरतोय.”
ती असेही म्हणाली, “आमच्या दोघांच्या अशा अनेक मजेशीर आठवणी आहेत. तो माझ्या पाकिटातून ५० रुपये काढायचा आणि नंतर तेच पैसे मला रक्षाबंधन वेळी द्यायचा. या सगळ्या खूप गोड आणि मजेशीर आठवणी आहेत. आम्ही एकत्र मोठे झालो, पण नंतर आमचे मार्ग वेगळे होऊ लागले. कॉलेज सुरू झाल्यानंतर आमच्यात काहीसं अंतर निर्माण झाले. त्यानंतर सैफने चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केल्यानंतर आणि त्याला मुलं झाल्यानंतर आम्हाला फारसा वेळ एकत्र घालवता आला नाही.”
सबा असेही म्हणाली, “आम्ही कुटुंब म्हणून कायम एकमेकांच्या पाठीशी असतो. आमच्या प्रत्येकाचे स्वतःचे स्वतंत्र आयुष्य आहे. आम्ही एकमेकांना पुरेशी मोकळीकही देतो. या दोन्ही गोष्टींचा छान समतोल साधला आहे. एखादे संकट आले तर तो मला मदत करेल हा मला त्याच्याबद्दल विश्वास वाटतो. मला माहीत आहे की सोहा आणि सैफ कायम माझ्या पाठीशी आहेत आणि मीही त्यांच्या पाठीशी आहे; याबाबत मनात कोणतीही शंका नाही.”
याच मुलाखतीत सबाने करीनाबद्दलही वक्तव्य केले. ती म्हणाली, “करीना अजिबात नाटक करत नाही, ती खूप मजा करते. ती उत्तम काम करते. तिला नेमकं काय करायचं आहे हे तिला स्पष्टपणे माहीत असतं. ती जशी आहे, तशी ती स्वत:ला स्वीकारते, हे मला खूप आवडतं. तिच्याबद्दल वाईट बोलले तर ती म्हणते की ठीक आहे, मग काय झालं? स्वतःबद्दल इतक्या स्पष्ट असलेल्या व्यक्तीचे मला खूप कौतुक वाटते. तिच्याबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. कारण ती जशी आहे तशीच लोकांसमोर असते; दुसरे कोणीतरी असल्याचे भासवण्याचा ती कधीही प्रयत्न करत नाही.”
सबा असेही म्हणाली, “करीना तिच्या कामाबद्दल खूप प्रामाणिक आहे. ती स्पष्टवक्ती आहे, पण ती पाठिंबाही देते. करीना माझ्याबरोबर खूप प्रेमाने आणि आपुलकीने वागते”, असे म्हणत सबाने करीनाचे कौतुक केले.
