The Buckingham Murders box office collection day 1: करीना कपूर खानची मुख्य भूमिका असलेला ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ हा चित्रपट शुक्रवारी (१३ सप्टेंबर रोजी) प्रदर्शित झाला. हा चित्रपट देशभरात मर्यादित स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला. देशभरात पहिल्या दिवशी चित्रपटाचे फक्त १३०० शो होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केले आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली, याबाबत माहिती समोर आली आहे.
करीना कपूर खानच्या (Kareena Kapoor Khan) ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फार चांगली कामगिरी केलेली नाही. , इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या अंदाजानुसार या चित्रपटाने शुक्रवारी फक्त १.१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा क्राईम थ्रिलर १३ सप्टेंबर रोजी रिलीज झाला. चित्रपटाची कमाई फार चांगली नसली तरी समीक्षकांनी करीना कपूरच्या तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. २०२४ मधील हा तिचा दुसरा चित्रपट आहे. ‘क्रू’ नंतर आता याच वर्षी ती दुसऱ्यांदा ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
करीना कपूर, क्रिती सेनॉन, तब्बू यांचा ‘क्रू’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. या चित्रपटाने देशभरात १५७ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर आता तिच्या ‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. चित्रपटाची पहिल्या दिवसाची कमाई फार चांगली नसली तरी वीकेंडला तो किती कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वीकेंडला कमाईत वाढ होणार?
या आठवड्यात कोणतेही मोठे चित्रपट रिलीज होणार नाहीयेत, त्यामुळे करीना कपूरच्या क्राइम थ्रिलरच्या कलेक्शनमध्ये वीकेंडला वाढ होऊ शकते, अशी शक्यता आहे. बकिंगहॅम मर्डर्स हा एका ब्रिटिश-भारतीय गुप्तहेरभोवती फिरतो. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि करीना कपूर यांनी संयुक्तपणे केली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षीचा सरप्राईज हिट 12th फेल बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. विक्रांत मॅसी व मेधा शंकर यांच्या भूमिका असलेला हा चित्रपट मर्यादित स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला होता. पण लोकांनी या चित्रपटाला खूप चांगला प्रतिसाद दिला. ज्यांनी सिनेमा पाहिला, त्यांनी त्याचं कौतुक केलं आणि अशाच रितीने या चित्रपटाने तब्बल ७० कोटी रुपयांहून जास्त कमाई केली होती.