अभिनेत्री करीना कपूर खान व करिश्मा कपूर यांचे आई-वडील बबिता व रणधीर कपूर आता एकत्र राहतात. ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर व एकेकाळी अभिनेत्री राहिलेल्या बबिता यांच्यात बरीच वर्षे दुरावा होता. तो अलीकडेच संपला. दोघांचा प्रेमविवाह होता, पण तरीही मुलींच्या जन्मानंतर घटस्फोट न घेता ते जवळपास ३५ वर्षे वेगळे राहिले.
रणधीर व बबिता यांनी १९७१ मध्ये लग्न केलं होतं आणि नंतर १९८८ मध्ये ते वेगळे झाले होते. तब्बल ३५ वर्षांनी ते पुन्हा एकत्र आले. इतके दिवस दूर राहूनही त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. त्यांनी पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतल्यावर मुलींनी व कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला होता.
रणधीर व बबिता यांची लव्ह स्टोरी
रणधीर कपूर आणि बबिता यांची पहिली भेट १९६९ मध्ये आलेल्या ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाच्या माध्यमातून दोघांची एकमेकांची ओळख झाली आणि नंतर हळूहळू त्यांच्यात भेटीगाठी वाढत गेल्या. त्यांचे वडील राज कपूर यांना रणधीर कपूर यांच्या अफेअर बद्दल कळतात “तू तिच्याशी लग्न कधी करणार आहेस?” असा प्रश्न त्यांना विचारला. त्यावेळी त्या दोघांचा दोघांचाही लग्नाचा कोणताही प्लॅन नव्हता. पण घरच्यांच्या सांगण्यावरून त्यांनी ६ नोव्हेंबर १९७१ रोजी लग्नगाठ बांधली होती.
रणधीर व बबिता वेगळे का झाले?
८०च्या दशकात रणधीर कपूर यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकत नव्हते. त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. त्यामुळे ते खूप अस्वस्थ होऊ लागले आणि त्यांनी दारू पिण्यास सुरुवात केली. दारू पिण्याचं व्यसन दिवसेंदिवस वाढत होतं. मुली मोठ्या होत होत्या. रणधीर यांच्या दारूच्या सवयीमुळे बबिता यांनाही त्रास होऊ लागला. यावरून दोघांमध्ये अनेकदा वाद झाले.

१९८८ मध्ये रणधीर कपूर त्यांच्या आई-वडिलांबरोबर राहायला निघून गेले. त्यांनी मुलींना पत्नीबरोबर सोडलं. त्यावेळी करिश्मा १४ आणि करीना ८ वर्षांची होती. बबिता यांनी विविध प्रकारचे बिझनेस करून मुलींचं संगोपन केलं. कपूर कुटुंबात जन्मलेल्या करीना व करिश्माला सर्वसामान्य मुलांप्रमाणे जगावं लागलं. कपूर कुटुंबाचा भाग असूनही त्यांच्या नशिबी संघर्ष आला. रणधीर मात्र आपल्या आई-वडिलांबरोबर राहू लागले.
दुसरीकडे मुली मोठ्या होत होत्या. मुलींनी चित्रपटात काम करावं, हेही रणधीर यांना मंजूर नव्हतं, त्यामुळेही त्यांच्यात वाद व्हायचे. करिश्मा व करीना कपूर दोघीही करिअरमध्ये यशस्वी ठरल्यानंतर रणधीर कपूर यांनी नमतं घेतलं. आणि मुलींच्या करिअरला, निर्णयाला पाठिंबा दिला. आता बरेचदा करीना व करिश्मा आपल्या आई-वडिलांबरोबर सण-उत्सव साजरे करत असतात.

