Kareena Kapoor Khan on Ramzan Roza : करीना कपूर बॉलीवूडमधील त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या नेहमी ठामपणे त्यांची मतं, प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. खासगी आयुष्य असो किंवा व्यावसायिक, करीना नेहमी मोकळेपणाने संवाद साधताना दिसते.

करीनाने अभिनेता‌ सैफ अली खानसह लग्न केलं होतं. दोघांचं आंतरधर्मीय लग्न आहे. करीना पंजाबी; तर सैफ मुस्लीम आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या रमजानबद्दल तिनं सांगितलं आहे. सैफबरोबर लग्न केल्यानंतर ती पतीकडील सणवार साजरे करते का याबद्दल सांगितलं आहे. रमजानमध्ये ती रोजा ठेवते का याबद्दल करीना काय म्हणाली जाणून घेऊयात…

करीना कपूर काय म्हणाली?

सध्या रमजान सुरू असल्याने करीनाचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिला ती या महिन्यात रोजे ठेवते का याबद्दल विचारलं आहे. करीनाने यावर नेहमीप्रमाणे स्पष्ट आणि खरं उत्तर दिलं आहे. करीना यावेळी म्हणाली, “नाही. मी २४ तास काही न काही खात असते. मी माझ्या आयुष्यात रोजा कधीच ठेवला नाहीये.”

करीना कपूर व सैफ अली खान नेहमी मुलाखतींमध्ये एकमेकांबद्दल बोलत असतात आणि कौतुकही करत असतात. द हॉलीवूड रिपोर्टरशी संवाद साधताना सैफ करीनाचं कौतुक करत म्हणालेला, “ती एक चांगली स्त्री आहे. मी माझ्या आयुष्यात भेटलेल्या सर्वांत संयमी आणि प्रेमळ माणसांपैकी ती एक आहे. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. ती खूप उत्तम प्रकारे घर सांभाळते. कॅमेऱ्यावर ती सर्जनशील असतेच. पण, आमच्याबरोबर असतानाही ती खूप सर्जनशील वागते.”

करीना व सैफ यांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलायचं झालं तर २००८ मध्ये ‘टशन’ चित्रपटाचं शूटिंग करत असताना त्यांची भेट झाली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार चालला नाही; पण यामुळेच दोघांची भेट झाली आणि दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. काही वर्षे डेट केल्यानंतर दोघांनी ऑक्टोबर २०१२मध्ये लग्न केलं. त्यानंतर त्यांच्या दोन मुलांचा जन्म झाला.

दरम्यान, करीना कपूरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिनं आतापर्यंत विविध चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. येत्या काळात ती मेघना गुलजार यांच्या ‘दायरा’ या चित्रपटातून झळकणार आहे.