Kareena Kapoor Khan talks about Saif Ali Khan’s ex-wife Amrita Singh : करीना कपूर खान व सैफ अली खान यांनी २०१२ मध्ये लग्न केलं. ‘टशन’ चित्रपटाच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि काही काळ डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून सैफ आणि करीना ही बॉलीवूडमधील एक आदर्श जोडी मानली जाते. त्यांना तैमूर आणि जेह ही दोन अपत्ये आहेत. मात्र, जेव्हा करीनाने सैफशी लग्न केलं, तेव्हा घटस्फोटित असलेल्या सैफला आधीच दोन अपत्ये होती. सैफचं पहिलं लग्न अमृता सिंहबरोबर झालं होतं. त्यांचं लग्न १३ वर्षे टिकलं आणि त्यांना सारा अली खान व इब्राहिम ही दोन मुलं आहेत. या दोघांनीही सैफ आणि करीनाच्या लग्नाला हजेरी लावली होती.

करीनाने सैफशी लग्न केलं तेव्हा तिच्याबद्दल बऱ्याच गोष्टी बोलल्या गेल्या, कारण सैफ घटस्फोटित होता आणि तो दोन मुलांचा बाबा होता. ‘कॉफी विथ करण’ सीझन ६ च्या शेवटच्या भागात करीना कपूर खानने तिचा पती सैफ अली खानबरोबरच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. ती सैफच्या आयुष्यात येण्यापूर्वीच त्याचं जुनं नातं संपलं होतं, असं तिने स्पष्ट केलं होतं. करण जोहरने “तुझं अमृता सिंहबरोबर चांगलं नातं आहे का? तुमचं एकमेकींशी बोलणं होतं का?” असं करीनाला विचारलं होतं.

करीना कपूर कधीच अमृता सिंहला भेटली नाही

त्यावर करीना म्हणालेली, “नाही, पण माझ्या मनात तिच्याबद्दल प्रचंड आदर आहे. आम्ही कधीही भेटलेलो नाही. तसेच, मी सैफला त्याच्या घटस्फोटानंतर अनेक वर्षांनी भेटले, त्यामुळे मी कोणाच्याही मध्ये आले नाही; तो पूर्णपणे सिंगल होता.”

करीना कपूरचं अमृता सिंहबद्दल वक्तव्य

गेल्या काही वर्षांत सारा आणि इब्राहिमचं करीनाबरोबरचं नातं खूप घट्ट झालं आहे. एका जुन्या मुलाखतीत करीना सैफची पहिली पत्नी आणि मुलांबद्दल मनमोकळेपणाने बोलली होती. ‘पीपल’ मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली होती की, तिने सैफला नेहमीच अमृताशी मैत्रीचं नातं ठेवण्यास सांगितलंय. “मला वाटतं की तिला नेहमीच आदर मिळायला हवा. माझ्या आई-वडिलांनी मला हेच शिकवलंय. त्यांचं लग्न झालं होतं आणि टिकलं नाही. मी सैफला नेहमीच तिच्याशी मैत्री ठेवण्यास सांगितलंय, कारण मला वाटतं की त्यांच्यात मैत्री असलेली चांगली. कदाचित त्यांना थोडा वेळ लागेल, पण ती गोष्ट त्यांनीच हाताळली पाहिजे. मी तिचा नेहमीच आदर करेन.”

सैफ करीनाच्या लग्नाबद्दल अमृता सिंहने काय म्हटलं होतं?

दुसरीकडे, अमृता सिंह हिनेही सैफ व करीनाच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली होती. अमृताने स्वतः साराला तिच्या वडिलांच्या लग्नासाठी तयार केलं होतं. तसेच अमृता कधीच मुलांशी त्यांच्या वडिलांबद्दल नकारात्मक बोलत नाही. सैफने ‘कॉफी विथ करण’मध्ये करण जोहरशी बोलताना अमृताचं कौतुक केलं होतं. तर अमृता एका मुलाखतीत म्हणालेली, “मी त्यादिवशी माझ्या मुलीचे सर्व कपडे स्वतः निवडले होते. सैफ आणि करीनाच्या लग्नासाठी मी सारा आणि इब्राहिम या दोघांनाही स्वतः तयार केलं होतं.”