Kareena Kapoor on her bond with Saif Ali Khan: करीना कपूर गेल्या काही दिवसांपासून सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचे जिममधून बाहेर येतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर ती प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या चर्चा खोट्या असल्याचे अभिनेत्रीच्या टीमने तसेच तिची नणंद सबाने स्पष्ट केले होते.
करीना लवकरच दायरा या क्राइम-थ्रिलर सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. अशातच तिचे एक वक्तव्य लक्ष वेधून घेत आहे. तिने एका मुलाखतीत सैफ अली खानबद्दल वक्तव्य केले आहे. ती नेमकं काय म्हणाली, हे जाणून घेऊ…
लग्नाच्या १४ वर्षांनंतर करीना कपूर व सैफ अली खान यांच्यातील नाते कसे आहे?
करीना कपूर खानने नुकताच झी कॅफेबरोबर संवाद साधला. यावेळी लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही पती सैफ अली खानबरोबर कसे बॉण्डिंग आहे याबद्दल तिने वक्तव्य केले. ती म्हणाली, “इतर पती-पत्नी जसे असतात, तसे आम्ही नाही. आम्ही आजही एकमेकांच्या प्रेमात बुडालेले आहोत. आम्ही एकमेकांचा आदर करतो. आम्हाला एकमेकांबरोबर वेळ घालवणे आवडते. जेव्हा मी थकलेले असते आणि मला घरी येऊन कॉफी किंवा वाईन प्यायची असते, त्यावेळी सगळ्यात आधी माझ्या डोक्यात सैफचा विचार येतो.”
करीनाने “यापेक्षा उत्तम काय असू शकते? अशा वेळी एखाद्या मैत्रीणीला फोन करावा असे मला वाटत नाही. आमच्यातील जे नाते आहे, ते कधीही बदलू नये अशी माझी अपेक्षा आहे. असे नाते नसेल तर त्यामध्ये काहीतरी समस्या असते”, असे म्हणत सैफ अली खानबरोबर उत्तम बॉण्डिंग असल्याचे तिने सांगितले.
करीना कपूर खान व सैफ अली खान यांनी १६ ऑक्टोबर २०१२ ला लग्नगाठ बांधली होती. त्यांनी मुंबईत जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. त्यांना दोन मुले आहेत. तैमूर व जेह अशी त्यांची नावे आहेत. तैमूरचा जन्म २० डिसेंबर २०१६ ला झाला, तर जेहचा जन्म २१ फेब्रुवारी २०२१ ला झाला. करीना व सैफप्रमाणेच तैमूर व जेह यांचा मोठा चाहतावर्ग आहे. त्यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.
दरम्यान, सैफचे हे दुसरे लग्न आहे. त्याचे पहिले लग्न १९९१ मध्ये अमृता सिंगबरोबर झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. इब्राहिम अली खान आणि सारा अली खान अशी त्यांची नावे आहेत. दोघेही बॉलीवूडमध्ये काम करत आहेत. दोघांचेही करीना व तिच्या मुलांबरोबर उत्तम नाते असल्याचे वेळोवेळी पाहायला मिळते.
