Akshaye Khanna Was Crush Of This Bollywood Actress : ‘छावा’ आणि नंतर ‘धुरंधर’मधील रहमान डकैत या भूमिकेमुळे अक्षय खन्नाने अनेकांची मनं जिंकली. त्याच्या लूकची, संवादांची प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली. सोशल मीडियावरही अभिनेत्याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले. कलाकार मंडळींनीही त्याच्या कामाचं कौतुक केलं.

अक्षय खन्नाने जोरदार कमबॅक केला अशी चर्चा त्याच्या चाहत्यांमध्ये आहे. अक्षय खन्ना कायमच विविध कथानक असलेल्या चित्रपटांतून प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याने कायम त्याच्या अभिनयशैलीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, अक्षय खन्ना फक्त प्रेक्षकांना आवडत नाहीये, तर त्याने कलाकारांनाही भूरळ घातली असून यापूर्वीसुद्धा तो लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूरचा क्रश होता आणि तिला तो प्रचंड आवडायचा.

करीना कपूरने दिलेली कबुली

माध्यमांच्या वृत्तानुसार करिना कपूरच्या ‘करिना कपूर द स्टाईल डायरी ऑफ बॉलीवूड दिवा’ या रोकेल पिंटो (Rochelle Pinto) यांनी लिहिलेल्या पुस्तकात करिनाने अक्षय खन्ना तिला आवडायचा असं लिहिलं आहे. करिना त्यावेळी लहान होती आणि तिची बहीण करिश्माबरोबर सेटवर जायची. या पुस्तकात लिहिलंय की, “माझ्यामध्ये आणि लोलोमध्ये सहा वर्षांचं वयाचं अंतर असल्याने तिने चित्रपटांत काम करायला सुरुवात केली तेव्हा मी लहान होते. पण, मी तिला सोबत म्हणून सेटवर जायचे. तिच्याबरोबर अनेक अभिनेत्यांनी स्क्रीनवर रोमान्स केला आहे. आम्ही तेव्हा आमच्या आवडत्या नायकांपासून खूप आनंदी व्हायचो.”

Award Banner

या सर्व नायकांपैकी एक नायक करिनाला खूप आवडला होता, ज्याबद्दल तिने स्वत: कबुलीही दिली होती. तिने पुढे “अक्षय खन्ना माझा क्रश होता आणि त्याला पाहिल्यानंतर आणि तो जेव्हा माझ्या आजूबाजूला असायचा, तेव्हा मी खूप आनंदी असायचे” असं लिहिलं आहे.

दरम्यान, अक्षय खन्ना ‘धुरंधर २’मधून पुन्हा एकदा रहमान डकैतच्या भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा सीक्वल १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे, तर करिना कपूर येत्या काळात ‘दायरा’ या क्राइम ड्रामा चित्रपटातून झळकणार आहे. मेघना गुलझार यांनी याचं दिग्दर्शन केलं आहे.