Kareena Kapoor Parenting Secrets Sons Taimur Jeh: बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर ही तिच्या ‘दायरा’ सिनेमामुळे चर्चेत आली आहे. करीना नेहमीच तिच्या हावभावातून तिच्या भावना व्यक्त करताना दिसून येते. पडद्यावर असो वा खऱ्या आयुष्यातही करीना बिनधास्तपणे बोलताना दिसून येते. करीनाने नुकताच तिच्या मुलांच्या संगोपनाबाबत एक खुलासा केला आहे. करीना स्वतः तिच्या मुलांना रडण्यासाठी सांगत असल्याचे तिने स्वतः सांगितले आहे.

करीना कपूर खानला तैमूर व जेह अशी दोन अपत्ये असून अनेकदा ती त्यांचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा ते करीनाबरोबर फिरायला गेल्याचे दिसून येतात. मुलांचे संगोपन करताना करीना ही स्वतः त्यांना भावना व्यक्त करण्याबाबत सांगत असते.
‘दायरा’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने मुलांनी संवेदनशील असणे आणि भावना व्यक्त करणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

माझ्या दोन्ही मुलांना ‘ही’ शिकवण देते – करीना

करीना म्हणाली, “शेवटी मी दोन मुलांची आई आहे आणि अर्थातच सध्याच्या सामाजिक स्थितीची मला भीती वाटते. एक आई म्हणून आपल्याला नेहमी आपल्या मुलांना चांगल्याच गोष्टी शिकवायच्या असतात आणि आपण कायम तो प्रयत्न करत असतो. मुलांचे संरक्षण करायचे असते आणि त्यांना जबाबदारीची जाणीव करून द्यायची असते, त्यामुळे मी नेहमीच माझ्या दोन्ही मुलांना माणुसकी आणि प्रेम द्यायला शिकवत असते.”

पुढे ती म्हणाली, “पुरुषांनी आणि मुलांनी नेहमी संवेदनशील आणि प्रेमळ असावे. अनेकदा मुलांपेक्षा मुली या फार संवेदनशील असतात, असा विचार केला जातो, पण ते खरे नाही. आज असे अनेक पुरुष आणि मुले आहेत, ज्यांना संवेदनशील असण्याची किंवा एखाद्या मुलीसमोर अथवा आपल्या आईसमोर रडण्याची भीती वाटत नाही. माझ्या मुलाला जेव्हा रडावेसे वाटते, तेव्हा मी त्याला रडायला सांगते. कारण त्याने त्या भावना समजून घेणे आणि त्याचा अनुभव घेणे हे खूप महत्त्वाचे आहे.”

दरम्यान, करीना कपूर खानचा ‘दायरा’ हा सिनेमा १८ सप्टेंबरला प्रदर्शित होणार असून सध्या ती सिनेमाचे प्रमोशन करत आहे. मुलांच्या सुरक्षेवर आधारित असलेल्या या क्राईम-थ्रिलर सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. यामध्ये करीना कपूरसह दाक्षिणात्य स्टार अभिनेता पृथ्वीराज सुकुमारन यांनी स्क्रीन शेअर केली आहे. त्याचबरोबर मराठमोळी अभिनेत्री क्षिती जोग व जितेंद्र जोशी यामध्ये झळकणार आहेत.