करीना कपूर खानने हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी करिअर घडवलं आहे. मात्र, तिने तरुणपणी घेतलेल्या एका निर्णयाची तिला आजही खंत वाटते. तो म्हणजे शिक्षण पूर्ण न करणं. नुकतंच अभिनेत्रीने अकरावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी अभ्यास सोडल्याबद्दल भाष्य केलं. या अनुभवाचा तिच्या मुलांच्या संगोपनावरही मोठा परिणाम झाला असल्याचं तिने सांगितलं.

हनुमान दास यांच्याशी संवाद साधताना करीना कपूरने सांगितलं की, तिने आपलं शिक्षण पूर्ण केलं नाही. अभिनेत्री म्हणून यश मिळवल्यानंतरही शिक्षण पूर्ण न केल्याची ही गोष्ट तिच्या मनात कायम राहिली. “मी माझं शिक्षण कधीच पूर्ण केलं नाही आणि ही गोष्ट माझ्या मनात कायम राहिली. माझ्याकडे संधी होती, पण मी चित्रपटांमध्ये आले आणि अकरावीनंतर पुढे शिक्षण घेतलं नाही” असं तिने सांगितलं.

करीना कपूरला आहे शिक्षण पूर्ण न केल्याची खंत

करीनाने मान्य केलं की शिक्षण सोडण्याच्या तिच्या निर्णयाबद्दल काही लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात. मात्र, आपल्या कामाच्या माध्यमातून स्वतःला सिद्ध करण्याचा तिचा निर्धार होता, असं तिने सांगितलं. “मला माहीत आहे की अनेक लोक माझ्या या निर्णयाची खिल्ली उडवू शकतात किंवा त्यांना जे वाटतं ते बोलू शकतात. पण मला अभिनेत्री म्हणून स्वतःला सिद्ध करायचं होतं. मला तेच करायचं होतं माझ्या मनाचं ऐकायचं होतं” असं तिने सांगितलं. त्याच वेळी, शिक्षण पूर्ण न केल्याची खंत आजही तिच्या मनात असल्याचं करीनाने कबूल केलं. ती म्हणाली, “शिक्षण पूर्ण न केल्याची मला नक्कीच खंत आहे”.

करीनाने सांगितलं की, शिक्षणाबाबतच्या तिच्या अनुभवाचा तिच्या मुलांना दिलेल्या सल्ल्यावरही परिणाम होतो. तैमूर आणि जेह यांनी भविष्यात त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावं, अशी तिची इच्छा आहे, मात्र त्याआधी त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण करावं, असं तिला वाटतं.

करीना कपूर म्हणाली, “म्हणूनच मी माझ्या मुलांनी आधी आपलं शिक्षण पूर्ण करावं आणि त्यानंतर आपल्या मनाचं ऐकून आवडीच्या क्षेत्रात पुढे जावं, यासाठी त्यांना कायम प्रोत्साहन दिलं आहे”.