२००९ साली ‘थ्री इडियट्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं. या चित्रपटातली गाणी संवाद चित्रपटाची कथा हे सर्वच सुपरहिट ठरलं. यासोबतच कौतुक झालं ते आमिर खान, आर माधवन आणि शर्मन जोशी यांच्या पडद्यावरील मैत्रीचं. आता हे तिघं पुन्हा एकदा एकत्र आलेले दिसले. त्यांना एकत्र पाहून आता ‘थ्री इडियट्स’चा दुसरा भाग प्रदर्शित होणार की काय अशा चर्चा रंगल्या आहेत.
आमिर खान सोशल मीडियावर सक्रिय नसला तरीही शर्मन जोशी आणि आर माधवन सोशल मीडियावरून त्यांच्या चाहत्यांशी संपर्कात असतात. त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी त्यांच्या चाहत्यांची शेअर करत असतात. मध्यंतरी शर्मन जोशीने त्याचा आमिर खान आणि आर माधवनबरोबरचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओमधून ‘३ इडियट्स’चा सीक्वल येणार असल्याचे संकेत मिळाले होते. पण हे तिघे शर्मनच्या आगामी ‘काँग्रॅज्युलेशन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र आले होते.
आणखी वाचा : ‘कांतारा २’ला अखेर सुरुवात; रिषभ शेट्टीने खास पोस्ट शेअर करत दिली माहिती
हे सगळं खोटं असल्याचा दावा नुकताच करीना कपूरने केला आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत तिने या तिघांच्या व्हायरल होणाऱ्या प्रेस कॉन्फरन्सवर भाष्य केलं आहे ज्यात हे तिघे शर्मनच्या चित्रपटाचं प्रमोशन करत आहेत. व्हिडिओमध्ये करीना म्हणाली, “मी सुट्टीवर असतानाच मला या प्रेस कॉन्फरन्सविषयी समजलं. हे तिघे आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, आणि हे शर्मनच्या चित्रपटाचं प्रमोशन तर अजिबात करत नाहीयेत. मला वाटतंय ते सीक्वलसाठी एकत्र आले आहेत. पण हे तिघेच का, तिथे मी पण हवी ना. माझ्याशिवाय कसं शक्य आहे? मला वाटतं बोमन इराणीलासुद्धा याबद्दल काहीच माहीती नसावी. मी आत्ताच बोमनला फोन करून विचारते नेमकं काय सुरू आहे. मला तरी ही सगळी सीक्वलची तयारी सुरू आहे असंच वाटतंय.”
करीनाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायल होत आहे. तिच्या या व्हिडिओमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘३ इडियट्स’चा सीक्वल निघणार असेल तर त्यात करीनाशिवाय दुसऱ्या कोणाचा विचारही होऊ शकत नाही असं तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओखाली कॉमेंट करत लिहिलं आहे. अर्थात याबद्दल अधिकृत घोषणा झालेली नसून लवकरच यामागील सत्य बाहेर येईल अशी अपेक्षा प्रेक्षकांना आहे.