Karishma Tanna Baby Boy Name: लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा तन्ना ४२ व्या वर्षी आई झाली. करिश्मा व तिचा पती वरुण बंगेरा यांनी लग्नानंतर ४ वर्षांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं. आज जन्माष्टमीचे औचित्य साधत करिश्माने तिच्या सव्वा महिन्याच्या मुलाचं नाव जाहीर केलं. करिश्मा व वरुण यांनी मुलाचं दोन अक्षरी, पण अर्थपूर्ण असं नाव ठेवलं आहे.

मुलाचे ठेवले दोन अक्षरी, अर्थपूर्ण नाव

करिश्मा आणि वरुणने आपल्या मुलाचे नाव ‘वेद’ ठेवले आहे. मुलाचे नाव ‘वेद तन्ना बंगेरा’ असं जाहीर करत तिने पोस्टमध्ये लिहिलं, “जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, कान्हाच्या आशीर्वादाने, आम्ही आमच्या चिमुकल्याचा अतिशय प्रेमाने परिचय करून देत आहोत. ‘वेद’ या नावाचा अर्थ पवित्र ज्ञान, बुद्धिमत्ता आणि प्रकाश असा होतो.” करिश्माच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, करिश्मा तन्ना व वरुण बंगेरा यांनी २९ जुलै रोजी आपल्या मुलाचं स्वागत केलं. त्यांचा लाडका वेद सव्वा महिन्याचा झाला आहे. “एक छोटासा चमत्कार, आमचं सर्वात मोठं गिफ्ट ऑगस्ट २०२६ मध्ये येणार आहे,” असं कॅप्शन देत करिश्मा तन्नाने तिच्या प्रेग्नेन्सीबद्दल माहिती दिली होती.

करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेराची लव्हस्टोरी

करिश्मा आणि वरुण ५ फेब्रुवारी २०२२ रोजी मुंबईत एका खासगी समारंभात विवाहबंधनात अडकले होते. एका कॉमन फ्रेंडद्वारे त्यांची भेट झाली होती आणि काही काळ डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. वरुण हा चित्रपटसृष्टीतील नसून ‘VB Corp’ या रिअल इस्टेट कंपनीत डायरेक्टर म्हणून कार्यरत असणारा एक यशस्वी व्यावसायिक आहे.

करिश्माचा अभिनयातील प्रवास

करिश्मा तन्ना गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून मनोरंजन सृष्टीत सक्रिय आहे. मॉडेलिंगपासून सुरुवात करणाऱ्या करिश्माने एकता कपूरच्या ‘क्युंकी सास भी कभी बहू थी’ या गाजलेल्या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर तिने ‘कही तो मिलेंगे’, ‘बालवीर’ आणि ‘नागिन ३’ यांसारख्या अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये काम केले.

करिश्मा रिअॅलिटी शोची क्वीन मानली जाते. ती ‘बिग बॉस ८’ ची रनर-अप होती. तसेच तिने ‘झलक दिखला जा ९’, ‘नच बलिये ७’ मध्ये सहभाग घेतला होता. ‘फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी १०’ ची ती विजेती ठरली होती. तिने ‘ग्रँड मस्ती’ आणि ‘संजू’ सिनेमात काम केलंय. तसेच २०२३ मध्ये स्कूप नावाच्या नेटफ्लिक्स सीरिजमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती.