Karisma Kapoor Abhishek Bachchan Breakup : ९० च्या दशकामध्ये बॉलीवूडवर राज्य करणारी अभिनेत्री करिश्मा कपूर ही, २५ जून २०२६ रोजी ५२ वा वाढदिवस साजरा करत आहे. सिनेविश्वात पिढ्यान् पिढ्या अभिनय करणाऱ्या कपूर घराण्यातील ती पहिली अभिनेत्री आहे. करिश्माचे सौंदर्य आणि तिचा प्रभावी अभिनय यांमुळे तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. आजही तिच्या चित्रपटांसह वैयक्तिक आयुष्यामुळे करिश्मा कपूर चर्चेत असते. कपूर घराण्याची ही मुलगी एकेकाळी बच्चन घराण्याची सून होणार होती. त्याची जाहीरपणे घोषणाही झाली होती; पण हे नाते काही महिन्यांतच तुटले. करिश्मा कपूरचे अभिषेक बच्चनशी लग्न होणार होते; मात्र त्यापूर्वी दोघांचे नाते तुटले.

एकेकाळी बॉलीवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांची जोडी होती. जवळपास चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांच्या नात्याची जोरदार चर्चा रंगली होती. या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि पुढे दोघांच्या लग्नाचीही घोषणा करण्यात आली. करिश्मा व अभिषेक या दोघांची पहिली भेट अभिषेकची बहीण श्वेता बच्चन हिच्या लग्नात झाली होती. १९९७ साली श्वेताचे लग्न करिश्माचा आतेभाऊ निखिल नंदा याच्याशी झाले. या कौटुंबिक समारंभादरम्यान अभिषेक आणि करिश्मा पहिल्यांदा भेटले आणि हळूहळू त्यांच्यामध्ये मैत्री झाली. नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले.

अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांचा झाला होता साखरपुडा

त्या काळामध्ये अभिनेत्री करिश्मा कपूर ही लोकप्रियतेच्या शिखरावर होती. करिश्माचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत होते आणि तिच्याकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स होत्या. मात्र, त्यावेळी अभिषेक बच्चनचे बॉलीवूडमध्ये पदार्पणही झाले नव्हते. अशा वेळी करिश्मा व अभिषेक एकमेकांना डेट करीत होते. दोन्ही कुटुंबांतून या नात्याला विरोध नव्हता. अभिषेक बच्चनचे करिअर सुरू झालेले नसले तरी अमिताभ बच्चन यांचा मुलगा असल्याने या नात्याला मान्यता होती. २००२ साली अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांचा साखरपुडा झाला होता. मात्र, अवघ्या चार महिन्यांमध्ये दोघांचे होणारे लग्न मोडले आणि त्यांचे नाते संपुष्टात आले.

जया बच्चन यांनी केली होती लग्नाची घोषणा

अमिताभ बच्चन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला जया बच्चन आणि अभिषेक बच्चनही उपस्थित होते. यावेळी जया बच्चन यांनी सर्वांसमोर करिश्मा कपूरची ओळख त्यांची होणारी सून अशी करून दिली होती. जया बच्चन म्हणाल्या होत्या, “आज बच्चन आणि नंदा कुटुंबाशी आणखी एक कुटुंब जोडले जाणार आहे आणि ते म्हणजे कपूर कुटुंब. रणधीर कपूर, बबिता कपूर आणि माझी होणारी सून करिश्मा कपूर. अभिषेकने त्याच्या वडिलांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आम्हाला हे सुंदर गिफ्ट दिले आहे.”

करिश्मा लोकप्रियतेच्या शिखरावर तर अभिषेकचे सिनेमे फ्लॉप

अभिषेक आणि करिश्माच्या नात्याची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने चर्चांना उधाण आले होते. अनेकांनी या नात्याला पसंती दर्शवली होती. यावेळी अभिषेकने बॉलीवूडमधील चित्रपटांमध्ये भूमिका करण्यास सुरुवात केली. अभिषेकने रिफ्युजी या चित्रपटातून पदार्पण केले; मात्र हा सिनेमा जास्त कमाई करू शकला नाही. त्यानंतर ‘ढाई अक्षर प्रेम के’, ‘तेरा जादू चल गया’, ‘ओम जय जगदीश’ हे चित्रपट प्रदर्शित झाले होते; मात्र ते सर्व फ्लॉप ठरले. अभिषेक बच्चनच्या करिअरची अशा रीतीने वाटचाल सुरू असल्यामुळे करिश्मा कपूरची आई बबिता या काळजीमध्ये होत्या.

का मोडले अभिषेक व करिश्माचे लग्न?

त्याच काळामध्ये करिश्मा कपूर ही बॉलीवूडची सर्वांत लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. तिने सिनेविश्वामध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली असल्यामुळे बबिता यांना तिच्या करिअरवर परिणाम होऊ द्यायचा नव्हता. तसेच लग्नापूर्वी जया बच्चन यांनी लग्नानंतर करिश्माला चित्रपटांमध्ये काम करणे थांबवावे लागेल, अशी अट घातली होती. त्यामुळे बबिता कपूर यांनी नारजी व्यक्त करीत ही अट मान्य नसल्याचे सांगितले होते. या कौटुंबिक वादामुळे अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांचा साखरपुडा होऊनही त्यांचे लग्न होऊ शकले नाही. अशा रीतीने अभिषेक बच्चन व करिश्मा कपूर यांची प्रेमकहाणी अपूर्णच राहिली.

करिश्माने २००३ मध्ये केला संजय कपूर यांच्याशी विवाह

अभिषेक बच्चनशी साखरपुडा होऊनही लग्न मोडल्यानंतर करिश्मा कपूरने २००३ मध्ये उद्योगपती संजय कपूरशी विवाह केला. करिश्मा व संजय यांना एक मुलगा व एक मुलगी आहे; मात्र पुढे त्यांचे हे नाते तुटले. २०१६ मध्ये करिश्मा कपूर व संजय कपूर यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर १२ जून २०२५ रोजी करिश्माचा एक्स-पती संजय कपूर यांचे निधन झाले. दरम्यानच्या काळात अभिषेक बच्चनने अभिनेत्री ऐश्वर्या रायशी २००७ मध्ये लग्न केले. ऐश्वर्या व अभिषेक यांना आराध्या ही एक मुलगी आहे.