Karisma Kapoor-Ex Husband Sunjay Kapur divorce settlement: करिश्मा कपूरने आजपर्यंत अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिचे राजा हिंदूस्तानी, दिल तो पागल है असे अनेक सिनेमे गाजले आहेत. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठा आहे.

करिश्मा सध्या चित्रपटात मोठ्या प्रमाणात सक्रिय नाही. मात्र, ती अनेकदा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. तिचा एक्स पती संजय कपूर यांचे निधन झाल्यानंतर करिश्मा व तिची मुले मोठ्या प्रमाणात चर्चेत आली होती.

२००३ मध्ये करिश्माने उद्योगपती संजय कपूर यांच्याबरोबर लग्न केले होते. त्यांच्या लग्नाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या होत्या. त्यांना दोन मुले झाली. मात्र, त्यांचे हे नाते फार काळ टिकू शकले नाही. ते २०१६ मध्ये वेगळे झाले.

लग्नाच्या ११ वर्षांनंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला त्यांनी एकमेकांच्या संमतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी एकमेकांवर इतके गंभीर आरोप केले की त्यांच्यात कायदेशीर लढाईला सुरुवात झाली. संजय कपूर यांनी शारीरिक व मानसिकरित्या शोषण केल्याचा आरोप करिश्माने घटस्फोटाच्या याचिकेत केला होता. तसेच, असेही म्हटले होते की जेव्हा ती गरोदर होती, त्यावेळी संजयच्या आईने दिलेला ड्रेस तिला बसत नव्हता, त्यावेळी संजयने त्याच्या आईला करिश्माला कानाखाली मारण्यास सांगितले होते. याबरोबरच, संजय यांनी देखील करिश्मावर आरोप केले होते. करिश्माने पैशांसाठी लग्न केल्याचे त्यांनी आरोप केला होता.

करिश्मा कपूर आणि दिवंगत संजय कपूर यांच्या घटस्फोटाच्या करारात काय ठरलं होत?

दोन वर्षे त्यांनी एकमेकांवर अनेक आरोप केले. त्यानंतर २०१६ मध्ये त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. त्यावेळी झालेल्या करारानुसार, अभिनेत्रीला त्यांची दोन मुले, समायरा आणि कियान यांचा ताबा मिळाला. संजय कपूर यांना त्यांच्या मुलांना भेटण्याचा आणि त्यांच्याबरोबर सुट्टी घालवण्याचा हक्क देण्यात आला.

तसेच, संजय कपूर यांनी करिश्मा कपूरला मुंबईमधील वांद्रे येथील त्याच्या वडिलांचा आलिशान बंगला दिला. त्याने करिश्माचे लग्नातील दागिनेही परत केले. संजय कपूर यांनी करिश्मासोबतच्या घटस्फोटाच्या तडजोडीचा भाग म्हणून त्यांची दोन मुले, कियान आणि समायरा यांच्यासाठी १४ कोटी रुपयांचे बॉण्ड्स खरेदी केले. या बॉण्ड्सवर दरमहा १० लाख रुपयांचे व्याज मिळते. याबरोबरच, करिश्मा कपूरने दिवंगत उद्योगपतीविरुद्ध दाखल केलेले घरगुती हिंसाचारासह सर्व कायदेशीर खटले मागे घेतले. संजय कपूर यांनी करिश्माला पोटगी म्हणून ७० कोटी रुपये दिले.

करिश्मा कपूरशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूरने प्रिया सचदेवळी लग्न केले. संजय कपूर यांचे हे तिसरे लग्न होते. त्यांना एक मुलगा आहे.
१२ जून २०२५ ला संजय कपूर यांचे निधन झाले.